कर भरा, अन्यथा मालमत्तेची विक्री
बार्शी नगरपालिका प्रशासनाचा थकबाकीदारांना इशारा
बार्शी(कटूसत्य वृत्त):- नगरपालिका हद्दीतील थकबाकीदारांना कर भरणा करण्यासाठी शासकीय सुट्टी दिवशीही कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहेत. थकबाकीदारांनी कर न भरल्यास त्यांच्या मालमत्तेची जप्ती अथवा विक्री अशी कारवाई होणार असल्याचे पालिका कर अधिकारी विठ्ठल पाटोळे यांनी सांगितले.
थकबाकीची रक्कम भरण्यासाठी दोन दिवस बाकी आहेत. शासनाच्या अभय योजनेअंतर्गत मे २०२५ पूर्वी थकबाकी असलेल्या थकबाकीदारांच्या रकमेवर शंभर टक्के व्याजमाफी करण्यात आली आहे. यामुळे या योजनेचा हजारो थकबाकीदारांनी लाभ घेतला असून इतरही थकबाकीदारांनी ३१ मार्चपूर्वी थकबाकीची रक्कम नगरपालिकेकडे जमा करावी, असे आवाहन पाटोळे यांनी केले आहे. दरम्यान, अभय योजनेमुळे काही थकबाकीदारांनी लाखो रुपयांच्या व्याजमाफीचा लाभ घेतला आहे. या योजनेची मुदत ३१ मार्चपर्यंतच असणार आहे. मात्र, चालू वर्षीच्या घरपट्टीवर शासनाने ठरवून दिलेला दंड आकारण्यात येणार आहे. थकबाकीची रक्कम न भरल्यास संबंधित मालमत्तेची जप्ती व विक्री करण्याचा निर्णय देखील नगरपालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. यासाठी चालू वर्षातील थकबाकीदारांनी कोणतीही शंका न ठेवता ३१ मार्चपूर्वीच आपल्या थकीत कराची रक्कम नगरपालिकेकडे भरावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, कर भरणा करण्यासाठी नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी सुट्टी असतानाही कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे. तथापि चालू वर्षीच्या घरपट्टी, नळपट्टी थकबाकीदारांच्या रकमेच्या व्याजातही एक टक्का सूट देण्यात आली आहे. पुढे जाऊन मालमत्तेबाबत काही वाद निर्माण होण्यापूर्वीच चालू थकबाकीदारांनीही कराचा भरणा करावा असे आवाहन पाटोळे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment