दहावी-बारावी परीक्षेत कॉपी प्रकरण उघड; १०३ शिक्षक-कर्मचाऱ्यांचे निलंबन
पुणे(कटूसत्य वृत्त):- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांदरम्यान यंदा कॉपीचे प्रकार मोठ्या प्रमाणात उघडकीस आले आहेत. सीसीटीव्ही यंत्रणेच्या मदतीने सामूहिक कॉपीचे अनेक प्रकार समोर आल्याने मंडळाने कठोर पावले उचलली आहेत.
या गैरप्रकारांमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाल्याने राज्यभरातील एकूण १०३ शिक्षक व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.
परीक्षा केंद्रांवरील शिस्त भंग करणाऱ्या दोषी पर्यवेक्षक, केंद्र संचालक तसेच इतर कर्मचाऱ्यांचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सहभाग स्पष्ट झाला आहे. त्यामुळे संबंधितांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
यंदाच्या परीक्षांमध्ये कॉपीचे प्रकार वाढल्याने शिक्षण मंडळाने परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्यासाठी आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर भूमिका घेतली आहे. आगामी काळातही अशा प्रकारांवर कडक नजर ठेवून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही मंडळाकडून देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment