भाजपने मराठ्यांवर राजकीय अन्याय केला
मराठा क्रांती मोर्चाचे 'मूक आंदोलन'
- मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री गोरे यांना अल्टिमेटम
- भाजपविरोधात राज्यभरात यात्रा काढणार
- महापौर विनायक कोंड्याल यांनी राजीनामा द्यावा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा समाजावर झालेल्या राजकीय अन्यायाच्या विरोधात आज सोलापूर शहरात मूक आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर मराठा समाजाला राजकीय प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा ठाम इशाराही यावेळी देण्यात आला.
मराठा आंदोलक व मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राम जाधव यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्र्यांनी मराठा समाजावर झालेल्या अन्यायाची दखल घेऊन तात्काळ राजकीय न्याय देण्याची भूमिका घ्यावी. अन्यथा सोलापुरातून सुरू झालेल्या आंदोलनाची धग संपूर्ण महाराष्ट्रात पसरल्याशिवाय राहणार नाही.”
यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा संपर्कप्रमुख शत्रुघ्न माने, डोणगावचे उपसरपंच रमेश पाटील, युवराज पाटील, बंटी सोनके, शिरीष सुरवसे, नंदू घाडगे, तुळशीदास शिंदे, राहुल जाधव, किरण शिरसागर, अक्षय गुंड, मारुती सुरवसे, ओमकार धावणे, सागर गायकवाड, राज सरडे, प्रतीक जाधव, रोहन आवताडे, आबा शिंदे, माऊली चटके, वीरेश कलशेट्टी, अक्षय पांडे, अक्षय माळवडकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलकांनी विविध मुद्द्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने मतपेटीतून स्पष्ट उत्तर दिले.
विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने भाजपला साथ दिली म्हणूनच सत्ता मिळाली.
मात्र सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे ५५ पेक्षा जास्त जागांचे स्वप्न असताना, मराठा समाजावर झालेल्या अन्यायामुळे पक्षाला केवळ ३८ जागांवर समाधान मानावे लागले, असा आरोप करण्यात आला.
१९९३ नंतरच्या ३२ वर्षांच्या काळात सर्वच राजकीय पक्षांनी विविध समाजांना महापौरपद देऊन न्याय दिला. यंदा तीन दशकांनंतर महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असताना मराठा समाजाचा महापौर न होणे, ही जाणीवपूर्वक केलेली राजकीय उपेक्षा असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
आंदोलकांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर थेट प्रश्न उपस्थित केले :
विद्यमान महापौर कोंड्याल यांचा राजीनामा घेऊन मराठा समाजाचा महापौर नेमणार का?
जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसीसाठी असताना “कुणबी मराठा” समाजाचा अध्यक्ष करून समाजाला न्याय देणार का?
मंगळवेढा तालुक्यातील दोन सर्वसाधारण जागांवर ओबीसी उमेदवार का दिले?
मराठा समाजाला प्रमुख पदांपासून वंचित ठेवण्याचा हेतू आहे का?
राम जाधव यांनी सांगितले की, गेल्या २० वर्षांत मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सर्वच राजकीय पक्षांविरोधात ५० हून अधिक आंदोलने केली आहेत. मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर आणि महामंडळाला ७०० कोटींचा निधी दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिला सत्कार मराठा समाजानेच केला होता. मात्र आता झालेल्या राजकीय अन्यायाविरोधात संघर्ष अटळ असून, जोपर्यंत मराठा समाजाला योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या आंदोलनामुळे सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडाली असून, आगामी काळात मराठा समाजाचा हा लढा अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

No comments:
Post a Comment