अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचवण्याच्या निर्णयानंतर उजनी धरणातून सोडलेले पाणी भीमा नदीपात्रातून मजल दरमजल करत शनिवारी (ता. २८) सकाळी आळगे बंधाऱ्यात दाखल झाले.
दिवसभर वाढलेल्या प्रवाहामुळे बंधारा भरल्यानंतर हे पाणी खानापूरच्या दिशेने पुढे सरकत दुपारी बारा वाजता खानापूर येथे पोचले.
खानापूर बंधाऱ्यातून पुढे वेगाने प्रवाह सुरू असून, हे पाणी उद्या (रविवारी) पहाटेनंतर हिळ्ळी बंधाऱ्यात दाखल होण्याची शक्यता आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर आळगे, खानापूर आणि हिळ्ळी या तिन्ही बंधाऱ्यांत पाणी पोचल्याने नदीकाठच्या शेतकरी व ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
या पाण्यामुळे मार्च व एप्रिल या दोन महिन्यांत नदीकाठच्या ऊस व चारा पिकांना तसेच पाणीपुरवठा योजनांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, पाणी येण्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नदीपात्रातील विद्युत मोटारी, वायर व इतर साहित्य सुरक्षित स्थळी हलवताना दिसत आहेत.
उजनीतून सोडलेल्या पाण्याचा प्रवाह सध्या चांगला आहे. आळगे व खानापूर बंधारे भरून पाणी हिळ्ळीपर्यंत पोचेल. तेथील साठा पुढील दोन महिने पुरेल. शेतकऱ्यांनी पाणीपट्टी वेळेवर भरून पाण्याचा योग्य वापर करावा.
- कृष्णा वडेर, शाखा अभियंता, अक्कलकोट

No comments:
Post a Comment