मराठा समाजावर अन्याय, भाजपविरोधात मतदानाचे आवाहन; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 5, 2026

मराठा समाजावर अन्याय, भाजपविरोधात मतदानाचे आवाहन; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

 मराठा समाजावर अन्याय, भाजपविरोधात मतदानाचे आवाहन;

 मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदावर गेल्या तीन दशकांपासून मराठा समाजाला डावलण्यात आल्याचा आरोप करत मराठा समाजात तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. यंदा तब्बल तीन दशकांनंतर मराठा समाजाला महापौर करण्याची संधी असतानाही ती हिरावून घेतल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभैय्या जाधव यांनी स्थानिक भाजप नेतृत्वावर थेट बोट ठेवले आहे.

रामभैय्या जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १९९३ नंतर गेल्या ३२ वर्षांत सर्वच राजकीय पक्षांनी मराठा समाजाला महापौर पदापासून वंचित ठेवले आहे. महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असतानाही ओबीसी समाजातील उमेदवाराला महापौर करण्यात आल्याने मराठा समाजावर अन्याय झाल्याची भावना तीव्र झाली आहे.त्यांच्या मते, १९९३ नंतर विविध पक्षांनी तीन वेळा पद्मशाली समाजाला, दोन वेळा मुस्लिम समाजाला, दोन वेळा लिंगायत समाजाला, दोन वेळा लमाण समाजाला, तर एक वेळा ब्राह्मण, कैकाडी आणि धनगर समाजाला महापौर पदाचा मान दिला आहे.मात्र, संख्येने मोठा, सामाजिकदृष्ट्या जबाबदार आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणारा मराठा समाज मात्र सातत्याने दुर्लक्षित राहिला असल्याचा आरोप त्यांनी केला.

“आम्ही कोणत्याही व्यक्ती किंवा समाजाच्या विरोधात नाही. प्रत्येक समाज हा आमचा लहान भाऊ आहे. मात्र गेल्या ३२ वर्षांपासून मराठा समाजाचा महापौर झाला नाही, म्हणून आम्ही केवळ न्यायाची मागणी केली होती,” असे जाधव यांनी स्पष्ट केले.



मराठा समाजावर झालेला हा राजकीय अन्याय समाज कधीही विसरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यापुढे शैक्षणिक, राजकीय, नोकरी आणि सामाजिक क्षेत्रात मराठा समाजावर अन्याय झाल्यास रस्त्यावर उतरून आवाज उठवला जाईल, असे त्यांनी सांगितले.या पार्श्वभूमीवर ७ तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सोलापूर व माढा मतदारसंघातील मराठा समाजातील मतदारांनी मतपेटीतून भाजपविरोधात मतदान करून उत्तर द्यावे, असे थेट आवाहन रामभैय्या जाधव यांनी केले आहे.

या वक्तव्यामुळे सोलापूरच्या राजकारणात खळबळ उडाली असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मराठा समाजाची भूमिका निर्णायक ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages