मोहोळमध्ये स्थापन करण्यात आला छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा
- रविवारी सकाळ नंतर कौशल्याने हाताळली पोलीस प्रशासनाने परिस्थिती
- वरिष्ठ स्तरावरील मार्गदर्शन घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण घेणार निर्णय
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ -पंढरपूर -आळंदी पालखी महामार्गाच्या प्रवेशद्वारा समोर बसस्थानका लगत असलेल्या सुरक्षित जागेत मोहोळ मधील शंभूप्रेमी युवकांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना करून रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्याचे विधिवत पूजन करण्यात आले. परवानगीशिवाय या पुतळ्याची स्थापना झाल्याची बाब प्रशासनाच्या लक्षात येताच या ठिकाणी तहसीलदार सचिन मुळीक, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, यांनी तात्काळ भेट दिली. सकाळपासूनच मोहोळ पोलीस प्रशासनाने या ठिकाणी चोख बंदोबस्त नियुक्त करत वरिष्ठ प्रशासकीय स्तरावरून आवश्यक त्या स्वरूपात मार्गदर्शन घेतले. त्यामुळे काही काळ का होईना या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होऊन तणावपूर्ण शांततेचे स्वरूप प्राप्त झाले होते. आता प्रशासन पोलीस बंदोबस्तात पुतळा काढणार अशा चर्चांना उधाण आल्यामुळे शहर आणि तालुक्यातील शेकडो युवक या ठिकाणी हळूहळू जमा होऊ लागले होते,मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर,पोलीस निरीक्षक बाजीराव पवार, सपोनी नितीन आतकरे,सपोनी किरण पाटील यांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाने शांततेचे आवाहन करत प्रशासकीय स्तरावरून दिलेल्या सूचनांचे पालन करण्याबाबतच्या सूचना सर्वांना दिल्यानंतर सर्वांनी प्रशासनाच्या सुंचनाचा आदर करत सहकार्य करण्याचे अभिवचन दिल्यानंतर प्रशासन आणि शंभू प्रेमी युवक यांच्यामधील अप्रत्यक्ष सुरू झालेला तणाव मोठ्या प्रमाणात निवळला. मोहोळ मधील या महत्वपूर्ण परिस्थितीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद,पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे दिवसभर लक्ष ठेवून होते.
यावेळी जरी काही काळ तणावाचे वातावरण असले तरी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मोहोळ पोलीस आणि महसुल प्रशासनाने अभूतपूर्व संयम बाळगत पुतळा स्थापना करणाऱ्या विविध समाजाच्या बांधवांशी संवाद सुरू ठेवत ही परिस्थिती अत्यंत कौतुकास्पदरित्या हाताळली. हा पुतळा स्थापन केलेली जागा ज्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पंढरपूर उपविभागाच्या कार्यालयाच्या कक्षेत येते त्या पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपव्यवस्थापक मुकेश कुमार सिंह सचिन पवार राजेश कुमार सोनी यांना मोहोळमध्ये तात्काळ पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती उपलब्ध होताच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, पोलीस निरीक्षक बाजीराव पवार, सपोनी. नितीन आतकरे सपोनी. किरण पाटील यांनी पुतळास्थळाच्या परिसरात येऊन सर्वांशी संवाद साधत शांततेचे आवाहन करत हि परिस्थिती कौशल्याने हाताळली.
मोहोळ शहर आणि तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्यात या विषयावर शांततामय मार्गाने महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करत यामध्ये समन्वयात्मक तोडगा काढण्यात आल्याचे बैठकीतील काही समाज बांधवांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सदर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला प्रशासकीय स्तरावरून त्वरीत परवानगी मिळण्यासाठीच्या प्रशासकीय प्रक्रियेला तात्काळ प्रारंभ करत असल्याचे नमुद करत सद्यस्थितीला आणि भविष्यातही सर्व शंभू प्रेमी युवक बांधव प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करतील असे ठोस आश्वासन पुतळा स्थापन करणाऱ्या युवकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.
चौकट
परवानगी न घेता पुतळ्याची स्थापना झाल्याने प्रशासनास अशा घटनेनंतर आवश्यक ती पूर्व दक्षता घेणे क्रमप्राप्त असते. या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नाही.ज्या ठिकाणी या पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे ती जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पंढरपूर उपविभागाच्या कक्षेत येते.त्यामुळे याबाबत सदर प्रशासकीय कार्यालयास त्वरीत अवगत करण्यात आले आहे. याबाबत सदर विभागाचे वरिष्ठ प्रशासकीय मार्गदर्शन आल्यानंतर संबंधित विभाग निर्णय घेणार आहे. दरम्यान या पुतळ्याच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताबरोबर संरक्षक बॅरिगेटिंग देखील करण्यात आले आहे. या घटनेवरून शहरातील सर्वधर्मसमभाव आणि जातीय सलोखा याला कुठेही तडा जाऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने बैठक घेत सर्वतोपरी प्रयत्न करत सर्वांना शांततेचे आवाहन केले. या दरम्यान सर्वांनी प्रशासकीय सूचनांचा आदर केल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार या दरम्यान घडला नाही.
बाजीराव पोवार
पोलीस निरीक्षक मोहोळ
.jpg)
0 Comments