शोकप्रस्तावावेळी सदस्यांचे डोळे पाणावले; महाराष्ट्राने गमावला कणखर नेता - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 24, 2026

शोकप्रस्तावावेळी सदस्यांचे डोळे पाणावले; महाराष्ट्राने गमावला कणखर नेता

शोकप्रस्तावावेळी सदस्यांचे डोळे पाणावले; महाराष्ट्राने गमावला कणखर नेता



मुंबई (कटूसत्य वृत्त):- अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेत वातावरण अत्यंत भावनिक झाले.दिवंगत नेते अजित पवार यांच्यावरील शोकप्रस्ताव मांडताना सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सदस्यांचे डोळे पाणावले.
उपमुख्यमंत्री एकनाथ  शिंदे  यांनी अत्यंत भावुक शब्दांत श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले, “लाखांचा पोशिंदा जावा आणि लाखो लोक अनाथ व्हावेत, अशी अवस्था अजितदादांच्या जाण्याने झाली आहे. दादा, तुमचे राजकीय निर्णय अचूक होते; पण जगाचा निरोप घेण्याचा निर्णय मात्र चुकला.” त्यांनी पवार यांच्या प्रशासनावरील पकडीचा, ११ वेळा अर्थसंकल्प मांडण्याच्या विक्रमाचा आणि ‘लाडकी बहीण’ योजनेत आर्थिक समतोल राखण्याच्या कौशल्याचा गौरव केला.
शिंदे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार  यांना धीर देताना दादांचा “विकास आता लांबणार नाही” हा निर्धार पूर्ण करण्याची ग्वाही दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस  यांनी कामकाज सुरू होताच सुनेत्रा पवार यांचा सभागृहाला अधिकृत परिचय करून दिला.
शंकेचे काहूर – अमोल मिटकरी
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी  यांनी विमान अपघाताबाबत शंका उपस्थित करत महाराष्ट्राच्या मनात संभ्रम असल्याचे सांगितले. “आज २३ फेब्रुवारीला दादांनी मला भेटीची वेळ दिली होती; मात्र आज त्यांच्याच शोकप्रस्तावावर बोलावे लागत आहे, हे दुर्दैव आहे,” असे ते म्हणाले.
“टीकेची मर्यादा पाळा” – उद्धव ठाकरे
शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शोकप्रस्तावावर बोलताना भावनिक आवाहन केले. “माणूस जिवंत असताना त्याचा जीव नकोसा होईल इतकी बदनामी करू नका. राजकारणात टीकेची मर्यादा असावी,” असे त्यांनी म्हटले. ७० हजार कोटींच्या आरोपांनंतरही अजितदादांनी कामातून उत्तर दिले, असे सांगताना ठाकरे यांना अश्रू अनावर झाले.
सभापती राम शिंदे, नीलम गोऱ्हे, प्रवीण दरेकर, सतेज पाटील, सचिन अहिर, प्रसाद लाड, चित्रा वाघ, मनीषा कायंदे, विक्रम काळे, निरंजन डावखरे, अभिजीत वंजारी यांच्यासह अनेक सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
याचवेळी सभागृहाने माजी मंत्री सुरूपसिंग हिऱ्या नाईक, अशोक मोडक, गंगाधर पटने आणि नीला देसाई यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.अजित पवार यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर निर्माण झालेली पोकळी आणि त्यांच्या कार्यशैलीबद्दलचा सर्वपक्षीय आदर विधान परिषदेत प्रकर्षाने जाणवला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages