विहिरीत कोसळलेल्या टेम्पोतील पाच जणांना जीवदान; इरफान मुजावर आणि निळकंठ चौगुले ठरले देवदूत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 15, 2026

विहिरीत कोसळलेल्या टेम्पोतील पाच जणांना जीवदान; इरफान मुजावर आणि निळकंठ चौगुले ठरले देवदूत

 विहिरीत कोसळलेल्या टेम्पोतील पाच जणांना जीवदान; इरफान मुजावर आणि निळकंठ चौगुले ठरले देवदूत




तांदूळवाडी दुर्घटनेत आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू; जीवाची पर्वा न करता विहिरीत उडी घेऊन केली बचावमोहीम


सातारा (कटूसत्य वृत्त) : सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथून सिद्धनाथाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप टेम्पोला भीषण अपघात झाला. सोलापूर रोडवरील तांदूळवाडी येथे रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरीचा अंदाज न आल्याने टेम्पो थेट विहिरीत कोसळला. या हृदयद्रावक दुर्घटनेत आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर काही जणांना स्थानिक युवकांच्या धाडसी प्रयत्नांमुळे नवजीवन मिळाले.


अपघात घडला त्याचवेळी तांदूळवाडी येथील इरफान मुजावर हा युवक दुचाकीवरून त्या मार्गाने जात होता. टेम्पो विहिरीत कोसळल्याचे त्याच्या निदर्शनास येताच त्याने क्षणाचाही विलंब न लावता गावात मदतीसाठी संपर्क साधला. मात्र मदत येण्याची वाट न पाहता त्याने थेट विहिरीत उडी घेतली.


बुडणाऱ्या चिमुकल्याला दिले जीवनदान

विहिरीत उडी घेतल्यानंतर इरफानच्या नजरेस एक लहान बाळ पाण्यात बुडताना दिसले. त्याने तात्काळ त्या चिमुकल्याला बाहेर काढले, छातीशी धरून त्याच्या पोटात गेलेले पाणी बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. त्यानंतरही त्याने धाडस सोडले नाही.


पाण्यात हालचाल दिसताच त्याने आणखी दोन लहान मुले, एक महिला आणि दोन पुरुषांना ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले. या जीवघेण्या बचावकार्यात त्याला गावातीलच निळकंठ चौगुले या तरुणाची मोलाची साथ मिळाली. निळकंठनेही कोणतीही भीती न बाळगता विहिरीत उडी घेत बचावकार्यात सहभाग घेतला.


पाच जणांचे प्राण वाचले, आठ जणांना वाचवता आले नाही

इरफान मुजावर आणि निळकंठ चौगुले यांच्या शौर्यामुळे पाच जणांचे प्राण वाचले. याशिवाय दोन पुरुष स्वतः पोहत विहिरीबाहेर येण्यात यशस्वी झाले. मात्र टेम्पो विहिरीत उलट्या बाजूने कोसळल्याने वाहनाच्या आतील भागात अडकलेल्या सात महिला आणि सहा महिन्यांच्या एका बाळाला वाचविणे शक्य झाले नाही.


या घटनेबाबत बोलताना इरफान मुजावरने दुःख व्यक्त करत सांगितले की, "आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण टेम्पोची स्थिती आणि परिस्थिती अत्यंत कठीण होती. अजून काही जीव वाचवता आले असते तर समाधान वाटले असते."


मानवतेचा धर्म सर्वात मोठा

तांदूळवाडीतील ही घटना केवळ एका अपघाताची कथा नाही, तर संकटसमयी माणुसकी कशी धावून येते याचे जिवंत उदाहरण आहे. इरफान मुजावर आणि निळकंठ चौगुले यांनी जात, धर्म, पंथ किंवा ओळख न पाहता केवळ मानवतेच्या भावनेतून स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवले.


काही दिवसांपूर्वी दिल्लीतील मालवीय नगर येथे लागलेल्या भीषण आगीतही अशीच मानवतेची प्रचीती आली होती. रियाजुद्दीन मन्सूरी आणि त्यांचा मुलगा अरमान यांनी स्वतःच्या दुकानातील गाद्या आणि रजया रस्त्यावर टाकून अनेकांचे प्राण वाचवले होते. आर्थिक नुकसान सहन करूनही त्यांनी मानवी जीवनाला प्राधान्य दिले.


द्वेषाच्या राजकारणाला मानवतेचे उत्तर

देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे आणि समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न सातत्याने होत असतात. मात्र अशा संकटांच्या क्षणी सर्वसामान्य नागरिक जेव्हा एकमेकांच्या मदतीला धावून जातात, तेव्हा भारताची खरी ओळख अधोरेखित होते.


तांदूळवाडीतील दुर्घटनेत इरफान मुजावर आणि निळकंठ चौगुले यांनी दाखवलेले धैर्य हे केवळ शौर्याचे उदाहरण नाही, तर "माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म" या मूल्याची प्रचिती आहे. द्वेषाचे बीज पेरणाऱ्यांच्या अजेंड्याला अशा घटना पुन्हा पुन्हा छेद देतात आणि समाजाला सांगतात की संकटसमयी धर्म नाही, तर माणूसच माणसाच्या मदतीला धावून येतो.


तांदूळवाडीतील या दुर्घटनेने अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असला, तरी इरफान आणि निळकंठ यांच्यासारख्या तरुणांनी दाखवलेल्या धाडसामुळे मानवतेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages