सोलापूर (कटूसत्य वृत्त) : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल उचलत जिल्हा परिषद सोलापूर आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना एक कोटी रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण उपलब्ध होणार असून कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्या पुढाकारातून हा करार साकारण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनीही यासाठी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी कराराची पार्श्वभूमी, कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ आणि योजनेचे महत्त्व विशद केले. राज्य शासनाच्या वेतन पॅकेज खात्यांतर्गत उपलब्ध विविध सुविधांचा अभ्यास करून कर्मचाऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळावेत यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी लेखाधिकारी हरीश म्हेत्रस, अविनाश गोडसे, अरुण क्षीरसागर, एस. पी. माने, दिनेश बनसोडे, राजेश देशपांडे, रणजीत घोडके आणि प्रकाश शेंडगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखाधिकारी उमाकांत राजगुरू यांनी केले.
चौकट
कर्मचाऱ्यांना मिळणार विविध लाभ
या कराराअंतर्गत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना विविध प्रकारचे विमा संरक्षण मिळणार आहे. अपघाती मृत्यू झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले जाईल. तसेच कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्वासाठी एक कोटी रुपयांपर्यंत भरपाई, अंशतः अपंगत्वासाठी आर्थिक मदत, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी साहाय्य, एअर अॅम्बुलन्सचा खर्च, प्लास्टिक सर्जरी व बर्न उपचार खर्चाचा समावेश आहे.
याशिवाय मुलीच्या विवाहासाठी आर्थिक साहाय्य तसेच एअर अॅक्सिडेंट कव्हरसारखे अतिरिक्त लाभही कर्मचाऱ्यांना उपलब्ध होणार आहेत.
No comments:
Post a Comment