दुधाच्या नावाखाली विष? मंगळवेढ्यात भेसळीचा काळाबाजार तेजीत! मनुष्यबळाचे कारण पुढे करून कारवाईत आखडता हात; नागरिकांमध्ये संताप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 15, 2026

दुधाच्या नावाखाली विष? मंगळवेढ्यात भेसळीचा काळाबाजार तेजीत! मनुष्यबळाचे कारण पुढे करून कारवाईत आखडता हात; नागरिकांमध्ये संताप

दुधाच्या नावाखाली विष? मंगळवेढ्यात भेसळीचा काळाबाजार तेजीत!

मनुष्यबळाचे कारण पुढे करून कारवाईत आखडता हात; नागरिकांमध्ये संताप 

मंगळवेढा (कटूसत्य वृत्त) : मंगळवेढा शहरासह तालुक्यात दूध भेसळीच्या प्रकारांत वाढ होत असल्याची गंभीर बाब समोर येत असून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दैनंदिन वापरातील दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याच्या तक्रारी वाढत असतानाही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर भेसळखोरांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. अशा परिस्थितीत मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात संबंधित विभागाकडून प्रभावी कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

स्थानिक नागरिक व काही दूध विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी दुधात पाण्याची सर्रास भेसळ केली जाते. तर काही ठिकाणी रासायनिक पदार्थांचा वापर करून दुधाची गुणवत्ता वाढल्याचा भास निर्माण केला जात असल्याची चर्चा आहे. यामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मंगळवेढा तालुक्यात दररोज सुमारे दोन ते अडीच लाख लिटर दूध संकलित केले जाते. काही नामांकित दूध संकलन केंद्रांमध्ये गुणवत्तेची तपासणी होत असली तरी अनेक खासगी दूध संकलकांकडून भेसळ होत असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. काही भेसळखोरांनी संबंधित यंत्रणांशी संधान साधल्याने किरकोळ कारवाईनंतर पुन्हा तेच रॅकेट सक्रिय होत असल्याचाही आरोप केला जात आहे.

मंगळवेढा, लक्ष्मी दहिवडी, आंधळगाव, पाठखळ, गुंजेगाव, नंदेश्वर, भोसे, मरवडे, मारापूर, अकोले, घरनिकी, गोणेवाडी, लेंडवे चिंचाळे व खुपसंगी परिसरातील हजारो शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीत दूध व्यवसायाचा मोठा वाटा आहे. मात्र काही जणांच्या गैरप्रकारांमुळे संपूर्ण दूध व्यवसायाची प्रतिमा मलिन होत असल्याची खंत प्रामाणिक दूध उत्पादक व विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

तालुक्यात सकाळी व संध्याकाळी विक्री होणाऱ्या खुल्या दुधाचे नियमित नमुना परीक्षण होत नसल्याची चर्चा असून, अधूनमधून छापे टाकण्यापेक्षा सातत्यपूर्ण तपासणी आणि कठोर कारवाईची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.

सरकारने दूध भेसळ रोखण्यासाठी कठोर कायदे केले असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही. मनुष्यबळाची कमतरता हे कारण पुढे करून संबंधित विभाग कारवाईपासून दूर राहत असल्याची टीका होत आहे. संशयास्पद दूध संकलन केंद्रे व संस्थांवर विशेष लक्ष ठेवून व्यापक तपासणी मोहीम राबवावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages