बुलेट ट्रेन, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा; शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या : राजू शेट्टी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 15, 2026

बुलेट ट्रेन, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा; शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या : राजू शेट्टी

बुलेट ट्रेन, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा; शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या : राजू शेट्टी




 पंढरपूर (कटूसत्य वृत्त) : उद्योजकांची कर्जे माफ करताना सरकारने जो न्याय लावला, तोच न्याय शेतकऱ्यांनाही देत विनाअट सरसकट कर्जमाफी जाहीर करावी. महाराष्ट्राच्या कोणत्याही फायद्याचे नसलेले बुलेट ट्रेन आणि शक्तीपीठ महामार्गासारखे प्रकल्प रद्द करून सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली.

आमदार रोहित पवार यांनी कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी पंढरपुरात सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या शेट्टी यांनी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर जोरदार टीका केली.

अन्नत्याग आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, खासदार बजरंग सोनवणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार, सलील देशमुख, आमदार राजू खरे, आमदार अभिजित पाटील, शेकापचे नेते जयंत पाटील, माजी मंत्री तथा रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, रविराज साबळे-पाटील यांच्यासह विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा दर्शविला.

यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी राज्यातील मोठे प्रकल्प हे जनहितासाठी नव्हे तर आर्थिक स्वार्थासाठी राबविले जात असल्याचा आरोप केला. "सत्ताधाऱ्यांना निवडणुकांसाठी पैसा गोळा करायचा आहे. राज्याची लूट करणाऱ्यांना जनता योग्य वेळी धडा शिकवेल," असे ते म्हणाले.

सरकारने पुढील एक-दोन दिवसांत कर्जमाफीवरील अटी रद्द केल्या नाहीत तर राज्यभर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा उपस्थित नेत्यांनी दिला. तसेच सरसकट कर्जमाफीचा निर्णय न झाल्यास मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरणे कठीण होईल, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

चौकट

आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची मोठी गर्दी

अन्नत्याग आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आंदोलनाची तीव्रता अधिक वाढल्याचे दिसून आले. राज्यातील विविध भागांतून शेतकरी पंढरपुरात दाखल झाले असून छत्रपती शिवाजी चौक परिसरात दिवसभर मोठी गर्दी होती. मागण्यांचे फलक हातात घेऊन शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. आंदोलनाची वाढती तीव्रता लक्षात घेता प्रशासनाने परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढविला असून वाहतुकीच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages