Hot Posts

6/recent/ticker-posts

गवळी वस्ती तालीम संघातर्फे शिवजयंतीनिमित्त विनोदी कीर्तन सोहळा !

 गवळी वस्ती तालीम संघातर्फे शिवजयंतीनिमित्त 

विनोदी कीर्तन सोहळा  ! 

सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- छत्रपती शिवाजी महाराज शिवाचा अवतार होते.राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडविले. त्याच संस्काराची शिदोरी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आई आणि रयतेसाठी स्वराज्य निर्माण केले.आईच्या दुधाची पर्वा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांनीच केली. छत्रपती शिवाजी महाराज स्त्री नाचवणारे नव्हते तर स्त्री वाचवणारे राजे होते.शिवरायांनी धर्माचे रक्षण केले,असे सांगत हिंदू म्हणून जन्माला आल्याचा अभिमान आणि स्वाभिमान सर्वांना असला पाहिजे,असे विचार राहुरी येथीललोकप्रिय  कीर्तनकार कु.शितलताई साबळे - पाटील यांनी मांडले. 

आई वडिलांशी प्रेमाने वागा,कौटुंबिक नात्याला तडा जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्याबरोबरच नातेसंबंध जपा,हेच आपले संस्कार, संस्कृती आणि संपत्ती असल्याचे शितलताईंनी यावेळी बोलताना सांगितले.

   गवळी वस्ती तालीम संघ सार्वजनिक शिवजन्मोत्सव व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने मंगळवारी सायंकाळी  दमानी नगर येथील ह.भ.प.आप्पाराव सवाळकर उद्यानात लोकप्रिय कीर्तनकार ह. भ. प. कु. शितललाई साबळे - पाटील यांचा कीर्तन सोहळा अयोजित करण्यात आला होता.यावेळी कीर्तनकार शितलताई साबळे - पाटील यांनी विनोदी कीर्तनाच्या माध्यमातून श्रोत्यांना खळखळून हसवले .कीर्तनातील विनोदी शैली आणि सामाजिक विषयांवरील मांडणीमुळे त्यांच्या कीर्तनाला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. 

     मुलांवर चांगले संसकृ करा.आईचे उपकार कधीच विसरू नका.आई म्हणजे प्रेमाचा अथांग सागर आणि निःस्वार्थ आशीर्वादाची मूर्ती होय. आई देवाची प्रचिती देते आणि कोणत्याही अपेक्षाशिवाय मुलांवर माया करते. आई वडील हेच खरे दैवत असून त्यांच्या प्रेमाची सर कशालाच येत नाही. प्रत्येक चूक सुधारण्यासाठी आई-वडीलच पाहिजेत. आयुष्य जगण्याची ट्रेनिंग आई-वडील देतात म्हणून तर आयुष्य जगता येते .माणसाला कठीण काळात सकारात्मक राहण्याची आणि यशाच्या दिशेने वाटचाल  करण्याची ऊर्जा आई-वडीलच देतात.आई-वडिलांच्या प्रेम आणि मायेचे उपकार जगातील कोणताही मुलगा किंवा मुलगी फेडू शकत नाही. तरुणपणात आईवडिलांचे एटीएम कार्ड तर म्हातारपणात आईवडिलांचे आधार कार्ड बना असा सल्लाही त्यांनी यावेळी बोलताना दिला.  घराघरातील वातावरण चांगले राहण्यासाठी आई-वडिलांशी प्रेमाने वागा,  मुला-मुलींनी आई-वडिलांची माया जपली पाहिजे.मुलामुलींनी आईवडिलांची मान खाली जाणार नाही ,याची काळजी घेतली पाहिजे. प्रेम,आपुलकी,जिव्हाळा आणि काळजी असेल तरच  नाते टिकते. असे सांगत कीर्तनकार शितलताई साबळे - पाटील यांनी विनोदी उदाहरणे देत अनेकांना खिळवून ठेवले.


  स्वतःवर विश्वास ठेवा, मोठी स्वप्न पहा आणि ती सत्यात उतरण्यासाठी कठोर मेहनत करा, हाच खरा यशाचा मंत्र आहे. आव्हानांना संधी म्हणून लढणे आणि हार न मानता प्रयत्न करणे यातूनच जीवन सार्थकी लागते. यशस्वी लोक संधी शोधत नाहीत, तर ते स्वतः संधी निर्माण करतात,असेहि शितलताई यावेळी बोलताना म्हणाल्या. कु.शितलताई साबळे - पाटील यांच्या सुश्राव्य व विनोदी कीर्तनाचा लाभ हजारो श्रोत्यांनी लाभ घेतला . 

     ह. भ. प. प्रभाकर महाराज वाघचौरे यांच्या संत तुकाराम महाराज वारकरी प्रशिक्षण संस्थेतील वारकऱ्यांची या कीर्तन सोहळ्याला साथ संगतकेली .तर औंढी येथील हनुमान भजनी मंडळ,गवळी वस्ती विठ्ठल मंदिर भजनी मंडळ, न्यू लक्ष्मी चाळ भजनी मंडळ, जय बजरंग भजनी मंडळ गवळी वस्ती, आणि मुक्ताई मंदीर भजनी मंडळ यांचे या कीर्तन सोहळ्यासाठी सहकार्य लाभले .

    प्रास्ताविकात नगरसेविका मृण्मयी गवळी यांनी गवळी वस्ती तालीम संघ सार्वजनिक शिवजन्मोत्सव व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने वर्षभर आयोजित केल्या जाणाऱ्या सामाजिक कार्याची माहिती सांगितली.

   यावेळी नगरसेविका मृण्मयी गवळी,सोनाली गायकवाड,मंडळाचे आधारस्तंभ महादेव गवळी,उत्सव अध्यक्ष सुनील कदम, चंद्रकांत पवार, औदुंबर जगताप,बाळासाहेब घुले,वामन वाघचौरे,अरुंधती महाराज गवळी,ईश्वर अहिरे,लहू गायकवाड, शेखर कवठेकर, संदीप काशीद, शाम गांगर्डे ,विष्णू जगताप, प्रशांत भगरे,महेश चव्हाण,सुरज काशीद,विजय घुले,अरविंद गवळी, लखन कारंडे यांच्यासह श्रोतावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Reactions

Post a Comment

0 Comments