“महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन पूर्ण सज्ज” - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, January 12, 2026

“महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन पूर्ण सज्ज”

 “महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन पूर्ण सज्ज”



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अंतिम टप्प्यात दाखल झाली असून, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी मतदान यंत्र वितरण केंद्र, स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणी केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीदरम्यान मतदान यंत्रांचे वितरण ऑन-कॅमेरा पद्धतीने आणि कडक पोलीस बंदोबस्तात होत असल्याची खातरजमा करण्यात आली. स्ट्रॉंग रूममध्ये सीसीटीव्हीच्या माध्यमातून २४ तास निगराणी ठेवण्यात येत असून, सीलिंग प्रक्रिया, प्रवेश-निर्गमन नियंत्रण व सुरक्षा व्यवस्था काटेकोरपणे राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी घेतली.
तसेच मतमोजणी केंद्रांवरील बैठक व्यवस्था, वीजपुरवठा, अग्निसुरक्षा, सीसीटीव्ही यंत्रणा तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती यांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा नियमांनुसार, दक्षतेने आणि पारदर्शकपणे राबविण्याचे निर्देश डॉ. ओम्बासे यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
भारत व राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यावर भर देत त्यांनी सुरक्षा व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. सोलापूर महानगरपालिका निवडणूक शांततेत, निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचा विश्वास महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी व्यक्त केला.
या पाहणीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages