सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरात गेल्या साठ वर्षांत कधीही न पाहिलेली अशी भयावह राजकीय परिस्थिती सध्या निर्माण झाली असून भाजपाकडून दहशतीचा वापर करून निवडणुका घेतल्या जात असल्याचा गंभीर आरोप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केला आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या टप्प्यापर्यंत सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी सांगितले.
महापालिकेत शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची आघाडी सत्तेत आल्यानंतर सोलापूर शहर दहशतमुक्त करण्याचा ठाम निर्धार शिवसेनेच्या आगामी वचननाम्यात करण्यात आला आहे. दहशतीच्या राजकारणाला सोलापूरकर कंटाळले असून नागरिकांना भयमुक्त वातावरणात जगता यावे, हा शिवसेनेचा मुख्य उद्देश असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
शिवसेना लवकरच आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार असून दहशतमुक्त, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख शहर घडवणे हे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. आगामी पाच वर्षांच्या महापालिका कारभारात नागरिकांच्या मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
शहरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला सुरळीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यावर शिवसेनेचा विशेष भर राहणार आहे. यासोबतच रस्ते विकास, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छ पाणीपुरवठा, आरोग्य सेवा तसेच अन्य नागरी सुविधांचा सर्वांगीण विकास करण्याची ठोस हमी वचननाम्यात देण्यात येणार आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या या भूमिकेमुळे शहरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर आधारित विकासात्मक राजकारणाची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
No comments:
Post a Comment