पिक प्रात्यक्षिक घटकाकरीता माहाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविण्यात येत आहे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया या नवीन अभियानाला मंजुरी दिली आहे. यात समूह आधारित कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सदर अभियानांतर्गत सोयाबीन, करडई, सुर्यफुल या पिकांसाठी सोलापुर जिल्हयाची निवड करण्यात आलेली आहे. सदर कार्यक्रमातंर्गत खरीप हंगामा मध्ये सोयाबिन व सुर्यफुल पिकाचे सुधारीत तंत्रज्ञानावर आधारीत समुह पिक प्रात्यक्षिके घटकात अनुदानावर बियाणे व निविष्ठा ही बाब शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था इ. द्वारे राबविण्यात येणार आहे. याकरीता MahaDBT पोर्टलद्वारे नोंदणीकृत शेतकरी गट / कंपनी / संस्था यांची निवड प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्वावर करण्यात येणार आहे.
निवड निकष -
शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था 31 मार्च, 2024 पूर्वी नोंदणी असणे आवश्यक आहे. शेतकरी गट कोणत्याही शासन यंत्रणेकडे नोंदणीकृत असावा. (जसे कि, आत्मा, महाराष्ट्र ग्रामीण जीवोन्त्रोत्ती अभियान (MSRLM), राष्ट्रीय ग्रामीण जीवोन्त्रोत्ती अभियान (NRLM), महिला आर्थिक विकास महामंडळ, नाबार्ड इ.), पिक प्रात्यक्षिकाची अंमलबजावणी करताना शेतकरी गटांना अनुसूचित जाती/जमाती प्रवर्गाच्या खातेदारांच्या उपलब्धतेनुसार सदर प्रवर्गाच्या शेतकरी व महिलांना विहित प्रमाणानुसार लाभ देणे बंधनकारक राहील. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे. सदरील शेतकऱ्यांचा गटामध्ये समावेश नसल्यास नव्याने नोंदणी करून समावेश करावा. लाभ द्यावयाच्या एकूण लाभार्थ्यांपैकी 30% महिला लाभार्थी असावेत
निवड झालेल्या शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी/कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था यांनी योजना मार्गदर्शक सुचनेमध्ये दिलेप्रमाणे प्रपत्र-1 नुसार हमीपत्र द्यावे. आवश्यक प्राधान्यक्रमाप्रमाणे शेतकरी गटामध्ये उपलब्ध नसतील तर, गटाबाहेरील पात्र शेतकऱ्यांची निवड करता येईल.
एका कुटुंबातील (पती, पत्नी व १८ वर्षा खालील अपत्य) एकाच व्यक्तीस लाभ देण्यात यावा.
पीक प्रात्यक्षिकासाठी निवडलेल्या गटात २५ पेक्षा जास्त शेतकरी असल्यास संबंधित गटाने २५ शेतकऱ्यांची निवड करावयाची आहे..
गटामध्ये जे शेतकरी शासनाने ठरवून दिलेल्या तंत्रज्ञानाप्रमाणे पीक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यास तयार असतील अशाच शेतकऱ्यांची निवड लाभार्थी म्हणून करावी.
गटातील शेतक-यांना पिक प्रात्यक्षिकाचा लाभ देताना Agristack वर नोंदणी असणे बंधनकारक आहे.
लाभार्थी गटाची निवड ही MahaDBT पोर्टलद्वारे होणार असल्याने कृषी विभागाकडील विहित नमुन्यातील हमीपत्र देण्यास तयार असावे.
प्रात्यक्षिकाच्या लाभार्थीसाठी मृदा आरोग्य कार्ड (Soil Health Card) मृदा चाचणी/केलेली असावी.
वरील निकषानुसार जिल्ह्यातील पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था यांना आवाहन करण्यात येते की, वरील घटकाचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक लाभार्थीनी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbtmahait.gov.in farmer login या संकेतस्थळावर अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सोलापुर शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.
0 Comments