देवेंद्रजी, तुम्हाला देशातील आरक्षण मराठ्यांच्या काठीने संपवायचे आहे का ? - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 24, 2024

देवेंद्रजी, तुम्हाला देशातील आरक्षण मराठ्यांच्या काठीने संपवायचे आहे का ?

देवेंद्रजी, तुम्हाला देशातील आरक्षण मराठ्यांच्या काठीने संपवायचे आहे का


बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या सरकारने बिहारमध्ये ५०% ची मर्यादा ओलांडून ६५ %  दिलेले आरक्षण पटना उच्च न्यायालयाने रद्द केले. महाराष्ट्रात यापूर्वी तुम्ही दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले आहे. तरीही तुमचा आग्रह पुन्हा एकदा मराठा समाजाला ५०% च्या वरचे दहा टक्के आरक्षण देण्याचा होता आणि तो तुम्ही पूर्ण केला. त्यावेळी तुम्ही आणि तुमचे दोन-चार मंत्री सोडले तर महाराष्ट्रात कुणीही साधे अभिनंदन सुद्धा केले नाही. कारण ते रद्द होणारे आरक्षण आहे हे सांगायला कायद्याच्या शिक्षणाची गरज नाही. तुमच्यासारख्या कायद्याची पदवी असणाऱ्या जबाबदार तत्कालीन मुख्य व विद्यमान उपमुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयातील इंद्र सहानी व त्यातील सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या लँडमार्क सूचनांचा अभ्यास केलेला दिसून येत नाही.

मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या प्रामाणिक व निस्वार्थी नेतृत्वाखाली जेव्हा एकत्र येऊन पुराव्यांच्या आणि कुणबी नोंदीच्या आधारे ५०% च्या आतले आरक्षण मागत होता त्यावेळेस त्यांना तुम्ही हर पद्धतीने विरोध केला. तुमचा विरोध मराठा समाजाच्या माय - माऊलींवर अमानुष लाठीहल्ला आणि गोळीबार करण्यापर्यंत गेला. मराठा समाजाच्या प्रामाणिक आणि कायदेशीर मागणीबद्दल गृहमंत्री फडणवीस साहेबांना एवढा द्वेष का (?) हा आजपर्यंत अनुत्तरीत असलेला प्रश्न आहे .

मराठा विरुद्ध ओबीसी,  मराठा विरुद्ध धनगर, ओबीसी विरुद्ध मुस्लिम असे वाद लावून महाराष्ट्रातील व देशातील महागाई, बेरोजगारी व विकासाचे प्रश्न आणि महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरात कडे नेण्याचा विषय विसराळू पाडण्याचा तुमचा डाव सुरू आहे का ? मराठा समाजाच्या काठीने देशातील आरक्षणाचा अधिकार मोडून काढण्याचा तुमचा डाव आहे का ? 

मराठ्यांच्या कुणबी आरक्षणाचा धनगर आणि वंजारी समाजाच्या आरक्षणावर कोणताही परिणाम होत नसताना त्यांना मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या विरोधात बसवण्याचे काम तुमचे नसेल कशावरून ? शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा आणि संस्कारांचा महाराष्ट्र अशांत ठेवण्याचा तुम्ही पण केलाय की काय ? 

देवेंद्र जी, आता तरी हा सगळा खेळ बंद करा. कुणबी नोंदणी आणि पुराव्यांच्या आधारे चे हक्काचे मराठ्यांचे आरक्षण मराठ्यांना द्या आणि मराठ्यांच्या टाकल्या मताला जागा. ५०% च्या वरच्या आरक्षणाचा खेळ तुम्ही का करत आहात ? बिहार ठेसकाळला आहे निदान आतातरी महाराष्ट्र सरकारने शहाणे व्हावे !

ॲड. श्रीरंग लाळे, मोहोळ,(जि.सोलापूर)

मो.9421909088

सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्हा  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages