विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांची जाणीव होणे काळाची गरज -ला. प्रा. प्रबुद्धचंद्र झपके

लायन्स क्लव, म.सा.प. नगर वाचन मंदिर व सांगोला विद्यामंदिर तर्फे सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार

सांगोला (कटूसत्य वृत्त):- विचार आणि आचार यांच्या समन्वयातून पडलेलं व्यक्तिमत्व केवळ शिक्षणामुळे निर्माण होते. आज शिक्षण क्षेत्रात प्रचंड जीवघेणी स्पर्धा सुरू आहे प्रत्येक स्पर्धेत आपला पाल्य टिकलाच पाहिजे असा आग्रह पालकांनी धरलेला आहे. शिक्षण क्षेत्रात विविध प्रकारचे बदल घडत आहेत. हे बदल घडत असताना विद्यार्थ्यांच्या गुणात्मकतेचा आलेख कसा वाढेल याकडे प्राधान्याने लक्ष दिले जात आहे परंतु गुणांबरोबरच त्याचा सामाजिक, भावनिक पातळीवरचा विकासही तितकाच महत्त्वपूर्ण आहे. विविध जीवनमूल्यांची जाणीव विद्यार्थ्याच्या मनामध्ये निर्माण होणे आवश्यक आहे.हेच अमोघ कार्य शिक्षक करतात असे प्रतिपादन सां.ता.शि.प्र.मंडळ, म.सा.प., नगर वाचन मंदिर सांगोला अध्यक्ष ला. प्रा. प्रबुद्धचंद्र अपके यांनी केले.
लायन्स क्लब ऑफ सांगोला, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला, महाराष्ट्र साहित्य परिषद् शाखा सांगोला व नगर वाचन मंदिर सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने ५ सप्टेंबर २०२२ शिक्षक दिनानिमित्त सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे
सेवानिवृत्त शिक्षकाच्या सत्कार समारंभामध्ये अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव म.शं. घोंगडे, सेवानिवृत्त शिक्षक सत्कार मूर्ती बाळासाहेब लिगाडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.प्रा. धनाजी चव्हाण उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांचे प्रतिमा पूजनाने झाली. नंतर सेवानिवृत्त शिक्षकांना शाल, पुष्पहार, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
प्रा.झपके पुढे म्हणाले की, समाजाची जडणघडण योग्य होण्यासाठी शिक्षकाचे कार्य महत्त्वाचे आहे. माझ्या तीन पिढ्या शिक्षकी पेशात आहेत याचा मला अभिमान आहे. पूज्य बापूसाहेब झपके यांचे जीवनमान मूल्यांनी भरलेले होते. त्यांचा आदर्श व प्रेरणा मी अंगीकारल्या आहेत. आपण ही आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले तर त्याचे आपल्याला समाधान लाभेल. शिक्षकांनी नीतीमूल्ये जपली पाहिजेत. जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोनालाच महत्त्व द्यावे असे सांगितले.यावेळी ॲड विजयसिंह चव्हाण यांनी आपल्या मनोगतात शिक्षक दिनाचे महत्त्व व शिक्षकांच्या कार्याचा गौरव करत शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाला लायन्स क्लब,म.सा.प.,नगर वाचन मंदिर सर्व पदाधिकारी, सदस्य, सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. प्रा. धनाजी चव्हाण यांनी केले. आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक लक्ष्मण जांगळे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन्स क्लबचे सचिव ला. उन्मेष
आटपाडीकर यांनी केले.
No comments:
Post a Comment