राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकप्राप्त क्रीडापटूंच्या बक्षीसात मोठी वाढ - क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन

मुंबई, (नासिकेत पानसरे):- राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रोत्साहन मिळावे,जास्तीत जास्त खेळाडू सहभागी व्हावेत, युवकांनी खेळाकडे आकर्षित व्हावे. याकरीता सरकारने राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मधील पदक विजेत्या क्रीडापटूंच्या बक्षिस रकमेत मोठी वाढ केली असल्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
मंत्रालयातील वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.महाजन म्हणाले, देशातील इतर राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहनासाठी देण्यात येणाऱ्या बक्षीस रकमेच्या तुलनेत आपल्या राज्याची रक्कम कमी होती. त्यामध्ये 5 पट वाढ करण्यात आली आहे. पूर्वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना 10 लाख रुपये देण्यात येत होते. आता ती रक्कम 50 लाख रुपये करण्यात आली आहे. रौप्यपदक विजेत्या खेळाडूंसाठी 7.50 लाख रुपये ऐवजी 30 लाख रुपये,तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूंना 5 लाख रुपये ऐवजी 20 लाख रुपये करण्यात आले आहेत असेही महाजन म्हणाले.त्याचप्रमाणे खेळाडूंचे मार्गदर्शक आहेत त्यांच्याही बक्षिसांची रक्कम वाढविण्यात आली आहे. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचे मार्गदर्शक 12.50 लाख रुपये, रौप्यपदक विजेत्या खेळाडूंचे मार्गदर्शक 7.50 लाख रुपये तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शक 5 लाख रुपये बक्षिस देण्यात येणार आहेत.
यावेळी त्यांनी शिवसेना आणि संभाजी बिग्रेड यांच्या युतीचा काही परीणाम होणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची दिशा चुकली आहे. म्हणूनच त्यांचे आमदार त्यांच्या सोबत राहिले नाहीत. रा.स्व.संघ आणि भाजपा यांच्यामध्ये कोणताही बनाव नसल्याचे महाजन यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
No comments:
Post a Comment