बाळराजे पाटील यांची ती पोस्ट केवळ एक सुविचार ; पक्षप्रवेशांच्या शक्यता केवळ अफवा

त्यांच्या पक्षांतरांची पक्षातीलच विरोधकांना लगीनघाई
मोहोळ (कटूसत्य वृत्त): गेल्या आठवड्यापासून मोहोळ तालुक्यातील राजकारण संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय पटलावर चर्चेत येताना दिसत आहे. त्याला निमित्त आहे राष्ट्रवादीचे युवा नेते आणि लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर टाकलेली सांकेतिक आणि सुचक शब्दातील ती पोस्ट. दोन जुलै रोजी सकाळी साडे नऊ वाजता केलेल्या या फेसबुक पोस्टमुळे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात बाळराजे पाटील यांच्या पक्षांतर शक्यतेच्या चर्चेला एकच उधाण आले. चर्चा काहीही असली तरी ती पोस्ट पक्षबदलाची अथवा राजकीय पक्षप्रवेशाशी संबंधित नसुन केवळ सुविचार असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजन पाटील, सुपुत्र बाळराजे पाटील आणि अजिंक्यराणा पाटील तसेच राष्ट्रवादीच्या कोणत्याही अधिकृत पदाधिकाऱ्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया न दिल्यामुळे ही चर्चा ही केवळ अफवाच असल्याचे हळूहळू स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्यांच्या अन्य पक्ष प्रवेशाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पक्षातील त्यांच्या विरोधकांच्या आनंदावर विरजण पडत आहे.
यापूर्वी देखील अनेकदा अनेक पक्षांनी त्यांना खेचून घेण्यासाठी मोठी राजकीय फिल्डिंग लावली होती. याशिवाय अनेक आर्थीक प्रकरणांमध्ये त्यांचे नाव असल्याची चर्चा तत्कालीन विरोधकांनी मोठ्या सोयीने पसरवली होती. जरी राजन पाटील हे राष्ट्रवादीचे निष्ठावंत नेते असले तरी जिल्ह्याच्या राजकारणात ते एक अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून सर्वपरिचित आहेत. गतवेळच्या भाजप सेना सत्ता कालावधीतही अनगरसह मोहोळ तालुक्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना असो अथवा मुख्यमंत्री सडक योजना असो इतर विविध प्रशासकीय योजनांचा निधी मोठ्या प्रमाणात त्यांनी आपल्या जनसंपर्काच्या जोरावर खेचून आणला होता. याशिवाय भाजपचे माजी खासदार शरद बनसोडे यांच्यासह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचा मित्रत्वाचा स्नेह आजही कायम आहे. त्यामुळे जरी ते राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असले तरी भाजपच्या जिल्ह्यातील आणि राज्यातील नेतृत्वाबद्दल मनामध्ये कधीही त्यांनी कटुता आणली नाही. त्यामुळे सेना अथवा भाजपच्या सत्ता वर्चस्वाकडून त्यांना कधीच आजवर टार्गेट केले गेले नाही. मात्र त्यांना व्यक्तिशः विरोध करणाऱ्या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील काही नेत्यांनी वेळोवेळी त्यांची राजकीय कोंडी झाली असून ते आता अन्य पक्षाच्या वाटेवर असल्याच्या बातम्या पेरल्या. मात्र याबाबत राजन पाटील यांनी कधीही स्पष्टीकरण देण्याची घाई केली नाही. केवळ तीन दिवसात अजितदादांची तारीख घेऊन पन्नास ते साठ हजार विराट जनसमुदायाचा शेतकरी मेळावा गत महिन्यात यशस्वी करत आणि अजितदादांकडून पाठीवर शाबासकीची थाप घेणाऱ्या राजन पाटील यांनी आजतागायत कोणतेही पक्षप्रवेशाचे संकेत दिले नाहीत. तरीही त्यांच्या पक्षबदलाची घाई झालेल्या पक्षातील विरोधकांनी जाणीवपूर्वक त्यांच्या अन्य पक्षात प्रवेशाच्या शक्यता गृहीत धरून त्यांना विरोधासाठी विरोध करणे सुरू ठेवले आहे. मात्र राजन पाटील यांनी तूर्तास वेट अँड वॉचची भूमिका धारण केल्यामुळे त्यांना विरोध करणाऱ्यांची मोठी वैचारिक कोंडी झाली आहे हे मात्र नक्की.
अनगरकरांच्या पक्षांतराचीच इतकी चर्चा का?
गतवेळी जरी भाजपचा खासदार झाला असला तरी गतवेळी मोदी लाट थोपवुन काँग्रेसला मताधिक्य विधानसभेलाही तीन वेगवेगळे उमेदवार मताधिक्याने निवडून आणण्याचे कौशल्य त्यांनी पार पाडले आहे. जरी पक्षश्रेष्ठींना त्यांच्या पुनर्वसनाचा विसर पडला असला तरी त्यांनी याबाबतची नाराजी कधीही बोलून दाखवली नाही. मात्र राष्ट्रवादीमधीलच काही उपनेत्यांनी विविध सभांमध्ये त्यांचे नाव घेऊन त्यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीत टीका करून त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ते काहीसे नाराज आहेत. याबाबतची नाराजी त्यांनी वेळोवेळी पक्षश्रेष्ठींना कळवून देखील पक्षश्रेष्ठींनी नरो वा कुंजरोवाची भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्यांनी अन्य पक्षात प्रवेश करावा असे वाटणे साहजिक आहे. मात्र या सर्व शक्यतांना फेटाळून लावत त्यांनी कायम राष्ट्रवादी सोबतच राहण्याची संयमी भूमिका स्वीकारली आहे.
भाजप लाटेतही मोठ्या मताधिक्याने तीन वेळा आमदार निवडून आणणारे राजन पाटील हे मोहोळ विधानसभेचे किंगमेकर नेते म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचे ते केवळ निष्ठावंत समर्थकच नाहीत तर ते राष्ट्रवादीच्या चढउताराच्या काळात कायम पक्षासोबत राहिलेले लढवय्ये राष्ट्रवादी नेते आहेत. त्यांनी वेळोवेळी राष्ट्रवादीने माझ्या मतदारसंघाला खूप काही दिलं आहे अशी भावनिक कृतज्ञता व्यक्त केली आहे. त्यामुळे ते कधीही पक्ष सोडण्याचा विचार करणाऱ्यापैकी नाहीत. शिवाय
मोहोळ मतदारसंघाच्या आजवरच्या जडणघडणीत आणि राजन पाटील यांच्या आजवरच्या राजकीय वाटचालीत बारामतीकरच मार्गदर्शक ठरले आहेत.
No comments:
Post a Comment