जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर; २,५४९ मतदार पात्र
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली. या यादीनुसार एकूण २ हजार ५४९ मतदार निवडणुकीसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये पंढरपूर तालुक्यातील ४० दूध संस्थांसह सांगोला तालुक्यातील २५ संस्थांचा समावेश आहे.
मात्र, काही संस्थांच्या मतदार यादीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल असल्याने अंतिम मतदारसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत २ हजार ४८५ मतदार पात्र होते. त्यानंतर हरकती आणि पात्रतेच्या छाननी प्रक्रियेत काही बदल करण्यात आले. अक्कलकोट तालुक्यातील एका दूध संस्थेला अपात्र ठरविण्यात आले, तर सांगोला तालुक्यातील 'अ' वर्गातील एका संस्थेचा समावेश करण्यात आला.
याशिवाय 'ई' वर्गातील ११, 'क' वर्गातील एक आणि 'ड' वर्गातील १२ संस्थांचा अंतिम मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे. पंढरपूर तालुक्यातील संस्थांचाही यादीत समावेश झाल्याने एकूण पात्र मतदारांची संख्या २ हजार ५४९ वर पोहोचली आहे. यामध्ये ३२१ वैयक्तिक मतदार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिली.
दरम्यान, माढा तालुक्यातील ६२ दूध संस्थांच्या मतदार यादीसह इतर तालुक्यांतील मतदार यादीवर काही जणांनी आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात धाव घेण्यात आली असून, या प्रकरणांवर अद्याप निर्णय झालेला नाही.
न्यायालयीन प्रकरणांचा निकाल लागल्यानंतर मतदार यादीत आणखी संस्थांचा समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील अंतिम मतदारसंख्येबाबत पुढील काळात चित्र स्पष्ट होणार आहे.

No comments:
Post a Comment