बॉक्सिंग स्पर्धेत सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयाचे यश
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय, नातेपुते येथील विद्यार्थ्यांनी आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या अंतर्गत १ ऑक्टोबर २०२६ रोजी छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज, सोलापूर येथे आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा २०२६-२७ पार पडल्या. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंनी यश संपादन केले.
या स्पर्धेत साईराज प्रदीप ननवरे याने ८० किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला, तर स्वप्निल पलंगे याने ५० किलो वजन गटात तृतीय क्रमांक मिळवला. दोन्ही खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या जोरावर ही यशस्वी कामगिरी केली.या यशाबद्दल महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सतेश पाटील यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “बॉक्सिंगसारख्या खेळामध्ये शारीरिक क्षमता, तंत्रशुद्ध सराव, एकाग्रता, आत्मविश्वास आणि जिद्द या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. खेळाडूंनी नियमित सरावासोबतच शिस्त आणि मेहनतीला प्राधान्य दिल्यास निश्चितच मोठे यश मिळवता येते. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही आपले कौशल्य सिद्ध करावे. महाविद्यालयाकडून खेळाडूंना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. साईराज ननवरे आणि स्वप्निल पलंगे यांनी मिळवलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. भविष्यातही त्यांनी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करावे, ही अपेक्षा शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सतेश पाटील यांनी व्यक्त केली.या यशाबद्दल संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिल सदस्या पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते-पाटील, संस्थेचे मार्गदर्शक संचालक तथा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील, संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका सौ. उर्वशीराजे धवलसिंह मोहिते-पाटील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगवानराव साळुंखे,महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:
Post a Comment