ॲड. आनंद कुर्डूकर यांची जिल्हा सरकारी वकीलपदी नियुक्ती
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा सरकारी वकीलपदाची धुरा आता ज्येष्ठ वकील आनंद कुर्डूकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना महाराष्ट्र शासनाने जारी केली आहे. दरम्यान, या पदावर कार्यरत असलेले प्रदीप रजपूत यांची सेवा तत्काळ प्रभावाने संपुष्टात आणल्याचेही शासनाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.
२० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; ३५१ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा मिळवून देण्यात मोठे योगदान
नूतन जिल्हा सरकारी वकील ॲड. आनंद कुर्डूकर हे सन १९८५ पासून विधी क्षेत्रात कार्यरत आहेत. गेल्या २० वर्षांपासून ते सहाय्यक सरकारी वकील (Assistant Government Pleader) म्हणून अत्यंत प्रभावीपणे काम पाहत आहेत.
आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी सरकार पक्षातर्फे सक्षमपणे बाजू मांडत तब्बल ३५१ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावून देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय न्यायालयीन योगदानाची आणि दांडग्या अनुभवाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.
विधी वर्तुळातून अभिनंदनाचा वर्षाव
ॲड. आनंद कुर्डूकर यांच्या नियुक्तीचे वृत्त समजताच सोलापूरच्या वकील वर्तुळात आनंद व्यक्त करण्यात आला. माजी जिल्हा सरकारी वकील संतोष न्हावकर, ज्येष्ठ विधिज्ञ उमेश मराठे, ॲड. शांतवीर महिंद्रकर यांच्यासह सोलापूर बार असोसिएशनमधील अनेक नामवंत विधिज्ञांनी ॲड. कुर्डूकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:
Post a Comment