लोप पावत चाललेली वाचन संस्कृती वृद्धिंगत करणे सामूहिक जबाबदारी- राजेंद्र गुंड
माढा (कटूसत्य वृत्त):- सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या व मोबाईलच्या युगात सातत्याने वाचन संस्कृती हळूहळू लोप पावत चाललेली आहे.ही बाब वैयक्तिक आणि देश हिताच्या दृष्टीने निश्चितच गंभीर व चिंताजनक आहे.वाचनाने मनुष्य शहाणा,ज्ञानी, संस्कारक्षम व निर्णयक्षम बनतो त्यामुळे लोप पावत चाललेली वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी क्रमिक पुस्तकांसह इतर ग्रंथ,पुस्तके व दर्जेदार साहित्य वाचनाची आवड व गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने शासन,प्रशासन शिक्षक,सुज्ञ व जागरूक नागरिक,पालक व विद्यार्थी यांनी कृतियुक्त प्रयत्नासह अमंलबजावणी करणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड सर यांनी केले आहे.
ते आनंदनगर-मानेगाव ता.माढा येथील श्री संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या 15 ऑक्टोबर रोजीच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा व हात स्वच्छ धुवा दिन साजरा करताना अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
प्रास्ताविक माजी प्रभारी मुख्याध्यापक प्रविणकुमार लटके यांनी केले.
सुरुवातीला महान शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी क्रिडाशिक्षक सचिन क्षीरसागर व सागर राजगुरू यांनी साबणाने हात स्वच्छ धुण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखवले.यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यिनी ईश्वरी कापसे व अनुष्का गवळी यांनी मनोगत व्यक्त केले.सर्व विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तकांसह इतर पुस्तकांचे सुमारे एक तास सामूहिक वाचन केले.
मुख्याध्यापक तुकाराम कापसे यांनी सांगितले की, डॉ.अब्दुल कलाम यांच्या कार्याचा आदर्श आजच्या पिढीने घेतला पाहिजे. भारताला महासत्ता बनविण्याचे त्यांचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत.शिक्षक व विद्यार्थ्यांनी दररोज लेखन व वाचनाची आवड जोपासली पाहिजे असे आवाहन केले.
-चौकट - यावेळी आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड सर यांनी सांगितले की,निरोगी शरीरातच निरोगी मन निवास करते तेंव्हा प्रत्येकाने शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी दररोज पहाटे व्यायाम व योगासने केली पाहिजेत.चांगले वर्तन व चांगल्या सवयी माणसाला यशाच्या शिखरावर नेतात. ज्यांनी देशासाठी चांगले काम केले आहे त्यांचा आदर्श व महान कार्य डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी.नेहमी मोठी स्वप्ने पहावीत व ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मुख्याध्यापक तुकाराम कापसे,प्रविण लटके,तनुजा तांबोळी, शिवाजी भोगे,सुनील खोत, सचिन क्षीरसागर,सागर राजगुरू यांच्यासह इयत्ता 5 वी ते 10 वीचे विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment