शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट; माणसांसह जनावरांच्या जगण्याचा संघर्ष - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 19, 2026

शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट; माणसांसह जनावरांच्या जगण्याचा संघर्ष

 शेतकऱ्यांपुढे दुहेरी संकट; माणसांसह जनावरांच्या जगण्याचा संघर्ष

सोलापूर जिल्ह्यात चारा संकटाची टांगती तलवार; पशुधन जगवायचे कसे?




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईसोबतच १८ लाख १७ हजार ६५२ पशुधनाला कसे जगवायचे, हा अत्यंत जिकिरीचा आणि अस्वस्थ करणारा प्रश्न बळीराजासमोर उभा ठाकला आहे.


संपूर्ण जिल्ह्यात उपलब्ध असलेला चाऱ्याचा साठा अवघे ४७ दिवस (सुमारे १.५ महिने) पुरेल इतकाच शिल्लक राहिला आहे. त्यामुळे दारात बांधलेल्या मुक्या जनावरांवर उपासमारीची वेळ आल्याने चिंतेचे ढग दाटले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक चिंताजनक स्थिती माळशिरस तालुक्याची आहे.

२ लाख ७९ हजारांहून अधिक पशुधन असलेल्या या तालुक्यात दिवसाला तब्बल ३ हजार २५१ मेट्रिक टन चाऱ्याची गरज आहे. केवळ २१ दिवस (तीन आठवडे) पुरेल इतकाच चारा शिल्लक आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात अवघा २७.५ दिवसांचा आणि बार्शी तालुक्यात ३१.४ दिवसांचा साठा शिल्लक राहिला आहे.

सांगोला (३७.९ दिवस), मंगळवेढा (४४.६ दिवस), माढा (४६.१ दिवस), करमाळा (४९.२ दिवस) आणि उत्तर सोलापूर (५० दिवस) या तालुक्यांमध्ये चाऱ्याची उपलब्धता दीड महिन्याच्या आसपास आहे. त्यामुळे एका महिनाभरात जिल्ह्यामध्ये चाऱ्याची भीषण टंचाई उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे.

पंढरपुरात सर्वाधिक म्हणजे ८९.२ दिवस (३ महिने) आणि अक्कलकोटमध्ये ८४.५ दिवस (२.८ महिने) पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याने तूर्तास काहीसा दिलासा आहे.

दैनंदिन गरज २१ हजार टनांची, साठा मात्र अपुरा

जिल्ह्यात ९ लाख ८२ हजार ६३० मोठी जनावरे (गाई, म्हशी, बैल) आणि ८ लाख ३५ हजार २२ लहान जनावरे (शेळ्या, मेंढ्या) मिळून १८,१७,६५२ पशुधन आहे. या पशुधनांसाठी दररोज २१,०२७.५ मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता भासते.

पेरणीच्या उपलब्ध दरानुसार जिल्ह्यात आजघडीला एकूण ९,८८,८७९ मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. हा साठा पुढील अवघ्या ४७ दिवसांत (१.५ महिने) पूर्णपणे संपुष्टात येणार आहे.


चौकट-
चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे. चारा लागवडीसाठी तीन कोटी रुपयांचे बियाणे वाटप करण्यात आले आहे. सिंचन क्षेत्रात आणि उजनी धरण क्षेत्रात प्रामुख्याने चारा लागवड करण्यावर भर देण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. - कुशल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages