मुंबईत ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षपूर्तीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 9, 2026

मुंबईत ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षपूर्तीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबईत ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षपूर्तीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन




मुंबई,(कटूसत्य वृत्त):-  ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने साहित्य अकादमी (राष्ट्रीय साहित्य संस्थान), संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

‘वंदे मातरम्’ हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील प्रेरणादायी प्रतीक असून, या गीताने देशवासीयांमध्ये राष्ट्रप्रेम आणि स्वातंत्र्याची भावना जागृत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या गीताच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमातून त्याचा ऐतिहासिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा अधोरेखित करण्यात येणार आहे.

साहित्य अकादमी ही संस्कृती मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत स्वायत्त साहित्य संस्था असून, साहित्य आणि भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून साहित्य आणि संस्कृती यांचा संगम घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून, तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. भारतीय सांस्कृतिक वारसा, साहित्य आणि राष्ट्रप्रेरणेशी निगडित कलाकृतींचा प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, काही जागा राखीव आहेत. मुंबईतील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages