मुंबईत रंगणार ‘झोके फुल गाण्यांचे’ गीतात्मक सोहळा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 9, 2026

मुंबईत रंगणार ‘झोके फुल गाण्यांचे’ गीतात्मक सोहळा

मुंबईत रंगणार ‘झोके फुल गाण्यांचे’ गीतात्मक सोहळा




मुंबई (कटूसत्य वृत्त):- बालकवी तथा निसर्गकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या निसर्गकवितांचा गीतात्मक आविष्कार सादर करणारा ‘झोके फुल गाण्यांचे’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, जे. के. सावंत मार्ग, यशवंत नाट्य मंदिराजवळ, माहीम/माटुंगा (पश्चिम), मुंबई – ४०० ०१६ येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

‘आनंदी आनंद गडे इकडे, तिकडे, चोहिकडे…’, ‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे…’, ‘हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे…’ अशा बालकवींच्या लोकप्रिय निसर्गकवितांमधील निसर्गसौंदर्य, श्रावणातील हिरवाई आणि मराठी मनातील भावविश्व गीत-संगीताच्या माध्यमातून रसिकांसमोर उलगडणार आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना व निवेदन प्राचार्य केशव परांजपे यांची असून, संगीत संयोजनात केशव परांजपे, मिलिंद करमरकर, जितेंद्र गोरे आणि निलेश मोहरीर सहभागी आहेत. माधुरी करमरकर, अदिती प्रभुदेसाई आणि मिलिंद करमरकर हे गायन सादर करणार असून, अतुल साटम हे कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. कनक क्रिएशन यांच्या माध्यमातून या गीतात्मक कार्यक्रमाची प्रस्तुती करण्यात येणार आहे.

बालकवींच्या कवितांमधून निसर्गाकडे पाहण्याची संवेदनशील दृष्टी, ऋतूंचे सौंदर्य आणि ग्रामीण जीवनाशी असलेले नाते प्रभावीपणे व्यक्त झाले आहे. त्यांच्या कवितांना गीतरूप देत सादर होणाऱ्या या कार्यक्रमातून मराठी साहित्य आणि संगीताचा सुंदर संगम रसिकांना अनुभवता येणार आहे.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. मराठी साहित्य, संगीत आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन व प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, मुंबईतील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बालकवींच्या निसर्गकवितांचा हा सुरेल गीतात्मक आविष्कार अनुभवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages