दक्षिण सोलापुरातील सहा तलावांत उजनीचे पाणी; पाणीटंचाईच्या संकटातून मोठा दिलासा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर तालुक्यात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उजनी धरणाचे पाणी तालुक्यातील सहा प्रमुख तलावांमध्ये पोहोचले आहे. मंद्रूप, निंबर्गी, शिरवळ (जै.), आचेगाव, हणमगाव आणि रामपूर या तलावांमध्ये उजनीचे पाणी पोहोचल्याने परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ आणि पशुपालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील काही महिन्यांपासून पावसाच्या लहरीपणामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक भागांत पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. भूजल पातळी खालावल्याने पिण्याच्या पाण्यासह शेती आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. अनेक तलाव कोरडे पडल्याने पशुपालकांसमोरही मोठे संकट निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासन आणि यंत्रणांच्या प्रयत्नातून उजनी धरणाचे पाणी या सहा प्रमुख तलावांमध्ये सोडण्यात आले. तलावांमध्ये पाणी पोहोचल्याने भूजल पातळी वाढण्यास मदत होणार असून, परिसरातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीतही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. उजनीचे पाणी मिळाल्यामुळे शेतीसाठी तसेच पशुधनासाठी उपलब्ध पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे. त्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments:
Post a Comment