डीजे, विनापरवाना फलकांवर बंदी कायम
गळ्यात सोन्याची साखळी मिरवणाऱ्या पोस्टरबाजांची होणार चौकशी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आगामी नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीतील डीजेवरील बंदी कायम राहील, तसेच विनापरवाना फलक लावून गळ्यात सोन्याच्या जाड साखळ्या मिरवत चमकोगिरी करणाऱ्या पोस्टरबाजांची विशेष चौकशी केली जाईल, असा इशारा शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिला.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयात शांतता समितीची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीचे प्रास्ताविक पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले, उत्सव काळात शांतता राखणे ही केवळ पोलिसांचीच नव्हे, तर मंडळे आणि नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी आहे. कोणत्याही अफवा किंवा गैरसमज पसरवणाऱ्या कृत्यांना थारा देऊ नका, संवेदनशील भागांत मिरवणुका विनाकारण रेंगाळत ठेवू नयेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
या वेळी नवरात्र महोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय पुकाळे यांनी फिरती स्वच्छतागृहे व पिण्याच्या पाण्याची मागणी केली. बैठकीस पोलीस उपआयुक्त वृष्टी जैन, डॉ. अश्विनी पाटील, प्रितम यावलकर, सहायक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री, गुन्हे शाखेचे दिलीप पवार, वाहतूक शाखेचे मनोज यादव, महापालिकेच्या वीना पवार, धर्मादाय कार्यालयाचे कपिल चोपडे, सिव्हिल सर्जन डॉ. कमलाकर माने, आरटीओचे स्वप्निल गिरी आणि शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
शांतता बैठकीत या विषयांवर देखील झाली चर्चा
पारंपरिक वाद्यांना प्राधान्य : मिरवणुकीत केवळ पारंपरिक वाद्ये वाजवावीत. सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनीप्रदूषण विषयक नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.
जबरदस्तीने वर्गणीस मनाई : मंडळांनी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करून रीतसर परवानगी घ्यावी. देणगी स्वेच्छेने दिल्यासच स्वीकारावी; कोणावरही सक्ती करू नये.
सुरक्षितता व सीसीटीव्ही : मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. महिला, लहान मुले व ज्येष्ठांच्या सुरक्षेसाठी स्वयंसेवकांनी दक्ष राहावे. मूर्तीची काळजी घ्यावी व मोकाट जनावरांचा बंदोबस्त ठेवावा.
वाहतुकीचे नियम : मंडपासाठी रस्त्याचा २/३ भाग वाहतुकीसाठी मोकळा ठेवावा. वाहनांचे सायलेन्सर काढून आवाज करणे, ट्रिपल सीट फिरणे व हुल्लडबाजीवर थेट दंडात्मक कारवाई होईल. मिरवणुकीत लांब कंटेनर वापरण्यास सक्त मनाई आहे.
सामाजिक संदेश : देखाव्यांमध्ये आक्षेपार्ह बाबी टाळून सायबर सुरक्षा, जलसंवर्धन, स्वच्छता व वृक्षारोपण अशा समाजोपयोगी जनजागृतीला प्राधान्य द्यावे.
पदयात्रेकरूंना संरक्षण : कोजागिरीनिमित्त तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांना कोणताही अडथळा येऊ नये म्हणून शहरात चोख पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात येईल.

No comments:
Post a Comment