सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात पॉक्सो कायद्याबाबत जनजागृती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, September 4, 2026

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात पॉक्सो कायद्याबाबत जनजागृती

 सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात पॉक्सो कायद्याबाबत जनजागृती




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बालकांचे लैंगिक शोषण व अत्याचार रोखण्यासाठी केवळ कायदे असणे पुरेसे नाही, तर त्यांची प्रभावी अंमलबजावणी आणि समाजातील प्रत्येक घटकाची सजगता आवश्यक आहे. बालकांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या कायदेशीर तरतुदी, त्यांच्या अधिकारांची तसेच अत्याचाराच्या घटनांमध्ये घ्यावयाच्या योग्य भूमिकेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमात करण्यात आले.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या कॉमन मिनिमम प्रोग्रामअंतर्गत आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर आणि सिंहगड इन्स्टिट्यूट्स यांच्या संयुक्त विद्यमाने एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव येथे कायदेविषयक व सामाजिक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात Protection of Children from Sexual Offences Act, 2012 (POCSO) अर्थात पॉक्सो कायद्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बालकांवरील लैंगिक अत्याचाराचे विविध प्रकार, त्याची संभाव्य लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, बालकांना मिळणारे कायदेशीर संरक्षण, तक्रार व मदतीची प्रक्रिया तसेच अशा घटनांची माहिती मिळाल्यास जबाबदार नागरिक म्हणून कोणती पावले उचलावीत, याबाबत विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.

‘Safeguarding Innocence: Overview of POCSO Act’ या विषयावर अॅड. श्रेया सापटणेकर यांनी मार्गदर्शन केले. बालकांच्या संरक्षणासाठी पॉक्सो कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी, बालकांच्या हिताला दिलेले प्राधान्य आणि संवेदनशील प्रकरणांमध्ये कायदेशीर प्रक्रिया याविषयी त्यांनी माहिती दिली. विद्यार्थ्यांसोबतच प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

बालकांशी संबंधित लैंगिक अत्याचाराच्या घटना अनेकदा भीती, दबाव किंवा माहितीच्या अभावामुळे समोर येत नाहीत. त्यामुळे बालकांशी संवाद साधताना विश्वासाचे वातावरण निर्माण करणे, संशयास्पद बाबींकडे दुर्लक्ष न करणे आणि योग्य वेळी सक्षम यंत्रणेकडे माहिती देणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. ‘बालकांचे संरक्षण ही केवळ पालकांची नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे,’ हा संदेशही कार्यक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंहगड इन्स्टिट्यूट्सचे कॅम्पस डायरेक्टर संजय एस. नवले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे सचिव तथा न्यायाधीश अमोलकुमार ए. देशपांडे यांच्या हस्ते कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास अॅड. बसवराज सलगर, अॅड. सुजय सापटणेकर, अॅड. श्रेया सापटणेकर तसेच सारथी यूथ फाउंडेशनचे संस्थापक सचिव रामचंद्र वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोलकुमार ए. देशपांडे यांचेही मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांनी संवादात्मक सत्रात उत्स्फूर्त सहभाग घेत पॉक्सो कायदा, बालकांचे संरक्षण, कायदेशीर मदत आणि सामाजिक जबाबदारी यासंदर्भात विविध प्रश्न विचारले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मार्गदर्शनपर उत्तरे देत कायद्याची माहिती केवळ परीक्षेपुरती मर्यादित न ठेवता दैनंदिन जीवनातही त्याचा उपयोग करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले, तर प्रियंका गायकवाड यांनी आभारप्रदर्शन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages