सोलापूर (कटूसत्य वृत्त) : विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात एसआयआर प्रक्रियेंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदारयादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रक्रियेत तब्बल ६ लाख २२ हजार ६७१ मतदारांची नावे प्रारूप मतदारयादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या आता ३३ लाख १८ हजार ४२४ इतकी झाली आहे.
एसआयआर प्रक्रियेदरम्यान मतदारयादीतील स्थलांतरित, मृत, दुबार तसेच गैरहजर मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. याशिवाय १ हजार ३०० पेक्षा अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. अतिरिक्त मतदार जवळच्या मतदान केंद्रांवर वर्ग करण्यात आल्याने जिल्ह्यात मतदान केंद्रांच्या संख्येत १७ ने वाढ झाली आहे. आता जिल्ह्यात एकूण ३ हजार ७४० मतदान केंद्रे आहेत.
विधानसभानिहाय पाहता सोलापूर शहर मध्य मतदारसंघात सर्वाधिक १ लाख १४ हजार ९५१ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यानंतर अक्कलकोटमधून ६५ हजार ४९८, सोलापूर दक्षिणमधून ६४ हजार ३२६, तर पंढरपूरमधून ६१ हजार ८८१ मतदारांची नावे कमी करण्यात आली आहेत.
दरम्यान, प्रारूप मतदारयादीतून नाव वगळले गेले असले तरी संबंधित मतदारांना आपले नाव पुन्हा समाविष्ट करून घेण्याची संधी देण्यात आली आहे. स्थलांतरित किंवा गैरहजर म्हणून नोंद झालेल्या मतदारांनी आवश्यक कागदपत्रे व पुरावे सादर करून संबंधित बीएलओशी संपर्क साधल्यास त्यांच्या नावाचा फेरविचार होऊ शकतो. त्यामुळे प्रारूप यादीतील वगळलेल्या मतदारांची संख्या अंतिम यादीत बदलण्याची शक्यता आहे.
विधानसभानिहाय वगळलेले मतदार
करमाळा : ४७,९३४
माढा : ३७,४०८
बार्शी : ४९,०९९
मोहोळ : ३७,३१७
सोलापूर शहर उत्तर : ७२,१७५
सोलापूर शहर मध्य : १,१४,९५१
अक्कलकोट : ६५,४९८
सोलापूर दक्षिण : ६४,३२६
पंढरपूर : ६१,८८१
सांगोला : ३४,३९४
माळशिरस : ३७,६८८
३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती
प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. प्राप्त दावे-हरकतींवर नोटीस देऊन त्यांचा निपटारा २९ ऑक्टोबरपर्यंत केला जाणार आहे. त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप मतदारयादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment