सोलापुरात सण-उत्सवांत पुन्हा डीजेचा दणदणाट; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : शहर व परिसरातील सण-उत्सव आणि विविध जयंतींच्या मिरवणुकांमध्ये काही काळ नियंत्रणात आलेला डीजेचा कर्णकर्कश आवाज पुन्हा वाढू लागला आहे. मिरवणुकांमध्ये आवाजाची मर्यादा ओलांडून डीजे वाजविले जात असतानाही कारवाई होत नसल्याने पोलीस व प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे सोलापूरकरांना पुन्हा डीजेच्या दणदणाटाचा त्रास सहन करावा लागत आहे.
गतवर्षी श्री गणेशोत्सवापासून शहरातील सार्वजनिक उत्सव आणि विविध जयंतींच्या मिरवणुकांमध्ये डीजेच्या वापरावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आले होते. त्यामुळे कर्णकर्कश आवाजापासून नागरिकांना काही महिन्यांसाठी दिलासा मिळाला होता. मात्र, अलीकडील काही जयंती व उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये पुन्हा मोठ्या आवाजात डीजे वाजविण्याचे प्रकार दिसून येत आहेत.
डीजेसोबतच मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लेसर लाईटचाही प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कार्यकर्त्यांसह रस्त्यावरील नागरिकांच्या डोळ्यांवर थेट लेसर किरणांचा मारा होत असतानाही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
डीजे पुन्हा सुरू होण्यामागे नेमके कारण काय?
काही काळ डीजेवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासनाला यश आले होते. मात्र, अलीकडील मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन होत असतानाही कठोर कारवाई होत नसल्याने डीजेचा वापर करणाऱ्या मंडळांना पुन्हा मोकळीक मिळत असल्याचे चित्र आहे. कर्णकर्कश आवाजाच्या मिरवणुका निघूनही संबंधित मंडळांवर कारवाई होत नसल्याने भविष्यात हा प्रकार आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
डीजेच्या मोठ्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी, रुग्ण तसेच ध्वनीप्रदूषणामुळे त्रस्त होणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सण-उत्सवांचा आनंद साजरा करताना इतर नागरिकांच्या आरोग्याचा आणि शांततेच्या अधिकाराचाही विचार करणे आवश्यक आहे.
पुन्हा डीजेबंदीची मशाल पेटविण्याची गरज
डीजेच्या दणदणाटामुळे होणारे सामाजिक आणि आरोग्यविषयक दुष्परिणाम लक्षात घेता मंडळांनीही स्वेच्छेने डीजेचा वापर टाळण्याची गरज आहे. तसेच पोलीस प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणताही भेदभाव न करता कठोर कारवाई करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
डीजेविरोधातील दबाव पुन्हा वाढविण्यासाठी राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, विविध संघटना आणि नागरिकांनी एकत्र येण्याची गरज आहे. सण-उत्सव उत्साहात साजरे व्हावेत; मात्र त्यासाठी सोलापूरकरांच्या शांततेची आणि आरोग्याची किंमत मोजावी लागू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment