सोलापूरच्या उद्योजकांना मिळणार ग्लोबल बाजारपेठेची संधी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 1, 2026

सोलापूरच्या उद्योजकांना मिळणार ग्लोबल बाजारपेठेची संधी

 सोलापूरच्या उद्योजकांना मिळणार ग्लोबल बाजारपेठेची संधी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांतील उद्योजकांना थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी २९ व ३० सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे रिव्हर्स बायर सेलर मीट आयोजित करण्यात आली आहे. या मेळाव्यात ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय खरेदीदार सहभागी होणार असून, भारतीय उद्योजकांना बीटूबी बैठकीच्या माध्यमातून थेट व्यावसायिक संपर्क साधण्याची संधी मिळणार आहे.
या संदर्भात सोलापुरात सोमवारी (दि. ३१) निर्यात प्रोत्साहन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्स (एफआयईओ), महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ, सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन, सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आणि विश्वमंगल मराठी बिझनेस फोरम यांच्या सहकार्याने झालेल्या या कार्यशाळेत तज्ज्ञांनी उद्योजकांना निर्यात व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले.
एफआयईओचे सहाय्यक संचालक अंकित देवळेकर यांनी रिव्हर्स बायर सेलर मीटची माहिती देत केंद्राच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या मार्केट अॅक्सेस सपोर्ट योजनेअंतर्गत उपलब्ध विविध सुविधांची माहिती दिली. सोलापूरच्या उद्योजकांनी या मेळाव्यात सहभागी होऊन नवीन आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा शोध घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
निर्यात तज्ज्ञ विनायक तेमगिरे यांनी सोलापूरच्या गणवेश उद्योगातून दरवर्षी सुमारे १० लाख गणवेशांची अप्रत्यक्ष निर्यात होत असल्याचे सांगितले. योग्य संशोधन साधने आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून आंतरराष्ट्रीय खरेदीदार कसे शोधावेत, प्रभावी व्यावसायिक संवाद कसा साधावा आणि ग्राहकांशी दीर्घकालीन संबंध कसे निर्माण करावेत, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. अनेक उद्योजक सक्षमपणे व्यवसाय करीत असले तरी थेट निर्यातीची प्रक्रिया माहिती नसल्यामुळे ते आंतरराष्ट्रीय संधींपासून दूर राहतात, असे त्यांनी नमूद केले.
सतीश पवार यांनी सोलापूरच्या औद्योगिक क्षेत्राचा आढावा मांडला. गणेश सुत्रावे यांनी स्थानिक उद्योगांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली, तर सुमित हब्बू यांनी उद्योग क्षेत्रातील संवाद आणि परस्पर सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी अमित जैन यांनी निर्यात व्यवसाय उभारणीतील आपला अनुभव सांगत आंतरराष्ट्रीय खरेदीदारांशी प्रभावीपणे संवाद साधण्याबाबत उद्योजकांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेला सोलापुरातील उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आगामी रिव्हर्स बायर सेलर मीटच्या माध्यमातून सोलापूरच्या उद्योगांना जागतिक बाजारपेठेत विस्ताराची नवी संधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages