राजकुमार मरगुरे यांना 'तपोरत्न गुणवंत शिक्षक पुरस्कार' जाहीर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने दिला जाणारा मानाचा 'तपोरत्न गुणवंत शिक्षक पुरस्कार' यंदा ज्येष्ठ व विद्यार्थीप्रिय शिक्षक राजकुमार सिद्धण्णा मरगुरे यांना जाहीर झाला आहे.
श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य श्री तपोरत्न योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या संकल्पनेतून गेल्या नऊ वर्षांपासून समाजातील आदर्श व गुणवंत शिक्षकांचा गौरव करण्यात येतो.पुरस्कार विजेते राजकुमार मरगुरे हे गेल्या ३१ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व निस्वार्थ सेवा बजावत आहेत. शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक व राष्ट्रीय कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. विद्यार्थी, पालक आणि सहकारी शिक्षकांशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे व आपुलकीचे संबंध असून निलम नगर परिसरात विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांचा मोठा नावलौकिक आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून शनिवार, दि. ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ३.०० वाजता, नेताजी शिक्षण संकुलातील तपोरत्नं सभागृहात मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात येणार आहे.
अशी माहिती गुणवंत शिक्षक पुरस्कार समितीचे सदस्य मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार व मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांनी दिली.

No comments:
Post a Comment