कोऱ्या ठरावांवरून मतदारयादी? दक्षिण सोलापुरात सहकार निवडणुकीच्या प्रक्रियेवर आ. सुभाष देशमुखांचा आक्षेप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 31, 2026

कोऱ्या ठरावांवरून मतदारयादी? दक्षिण सोलापुरात सहकार निवडणुकीच्या प्रक्रियेवर आ. सुभाष देशमुखांचा आक्षेप

 कोऱ्या ठरावांवरून मतदारयादी? दक्षिण सोलापुरात सहकार निवडणुकीच्या प्रक्रियेवर आ. सुभाष देशमुखांचा आक्षेप

दक्षिण सोलापूर (कटूसत्य वृत्त) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर तालुक्यात सहकारी संस्थांच्या ठरावांवरून राजकीय वातावरण तापले आहे. विविध सहकारी संस्थांच्या संचालकांना विश्वासात न घेता कोऱ्या ठरावांवर स्वाक्षऱ्या घेऊन मतदार प्रतिनिधींची यादी तयार केली जात असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पुणे विभागीय सहनिबंधकांकडे तक्रार दाखल करून संबंधित ठरावांची काटेकोर पडताळणी करण्याची मागणी केली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांकडून मतदान प्रतिनिधींचे ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या ठरावांपैकी जास्तीत जास्त ठराव आपल्या बाजूने करून घेण्यासाठी सत्ताधारी भाजपच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सहकार क्षेत्रात आहे. याच पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर तालुक्यात कोरे ठराव करून घेण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप आमदार देशमुख यांनी केला आहे.

पुणे विभागीय सहनिबंधकांकडे दिलेल्या तक्रारीत त्यांनी तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही संस्थांमध्ये अध्यक्ष व सचिव संगनमताने संचालकांना विश्वासात न घेता प्रोसिडिंग बुकवर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेत असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच संबंधित प्रोसिडिंग बुक तालुक्यातील एका माजी संचालकाच्या ताब्यात ठेवण्यात येत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. संचालक मंडळाची बैठक, ठरावाचा विषय आणि मतदान प्रतिनिधीची निवड याबाबत संचालकांना माहिती न देता ठराव मंजूर केल्यास त्यांच्या अधिकारांवर गदा येण्याची शक्यता असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सादर होणाऱ्या सर्व ठरावांची पारदर्शक पद्धतीने पडताळणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे सहकार विभाग आता या तक्रारीवर काय भूमिका घेतो, याकडे दक्षिण सोलापूरसह संपूर्ण जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

चौकट : ठराव प्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करा

सहकारी संस्थेचा ठराव घेताना तो संबंधित संस्थेच्या कार्यालयातच घेण्यात यावा. तसेच जीपीएस लोकेशनसह संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून त्याची प्रत सादर करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी केली आहे. प्रत्येक सहकारी संस्थेच्या ठराव प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी निबंधक कार्यालयाकडून स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages