पंढरपूर तालुक्यात दोन बालविवाह रोखले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 31, 2026

पंढरपूर तालुक्यात दोन बालविवाह रोखले

पंढरपूर तालुक्यात दोन बालविवाह रोखले

निर्भया पथकाची वेळीच कारवाई; दोन्ही मुलींचे वय अवघे १५ वर्षांखाली

पंढरपूर (कटूसत्य वृत्त) : पंढरपूर तालुक्यात एकाच दिवशी होणारे दोन बालविवाह रोखण्यात पंढरपूर पोलिसांच्या निर्भया पथकाला यश आले. गोपनीय माहिती मिळताच पथकाने तातडीने कारवाई करत अवघ्या १५ वर्षे वयाच्या दोन अल्पवयीन मुलींचे विवाह थांबवले. त्यामुळे बालविवाहाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

दि. ३० ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाणे व पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन बालविवाह होणार असल्याची गोपनीय माहिती निर्भया पथकाला मिळाली. माहिती मिळताच पथकाने दोन्ही ठिकाणी धाव घेत संबंधित कुटुंबीयांकडे चौकशी केली.

चौकशीदरम्यान नातेवाईकांनी सादर केलेल्या आधारकार्डवरून एका मुलीचे वय १४ वर्षे ११ महिने, तर दुसऱ्या मुलीचे वय १५ वर्षे असल्याचे समोर आले. पोलिसांनी अधिक खातरजमा करण्यासाठी दोन्ही मुलींचे शाळा सोडल्याचे दाखलेही तपासले. त्यावरही त्यांचे अल्पवय असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर निर्भया पथकाने मंडपातील उपस्थित मंडळी तसेच संबंधित वडिलांना बालविवाहाच्या कायदेशीर परिणामांची माहिती देत समज दिली आणि दोन्ही विवाह तत्काळ थांबवले. त्यापैकी एका अल्पवयीन मुलीला पुढील कार्यवाहीसाठी सोलापूर येथील बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले.

पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे पंढरपूर तालुक्यात बालविवाह लावणारे आणि करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांचे शिक्षण व भवितव्य अबाधित ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने घेतलेली ही भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक प्रेरणा कट्टे आणि सहायक पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाच्या प्रमुख महिला पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया यादव रावण, पोसई भोसले, पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोकॉ शशिकांत सावंत, वाघे, सपोफौ अरुण राजकर, पोकॉ काळे व पोकॉ माळी यांनी केली.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages