२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 15, 2026

२४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले

 २४ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पत्रकारांच्या घरांचे स्वप्न साकारले 

म्हाडा उपविभाग सोलापूर अंतर्गत २३८ सदनिकांची सोडत कार्यक्रम उत्साहात





सोलापूर(कटूसत्य वृत्त):-  दोन तपांहून अधिक काळापासून प्रतीक्षेत असलेल्या पत्रकारांच्या हक्काच्या घरांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने शनिवारी महत्त्वाचे पाऊल पडले. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) उपविभाग सोलापूरअंतर्गत सी.एस. क्र. २३२ येथे प्रधानमंत्री आवास योजनेत बांधण्यात आलेल्या २३८ सदनिकांची सोडत मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली. यामध्ये १२६ अत्यल्प उत्पन्न गट (EWS) आणि ११२ अल्प उत्पन्न गटातील (LIG) सदनिकांचा समावेश आहे.
         या कार्यक्रमास राज्यसभा खासदार डॉ. ज्योती वाघमारे, लोकसभेच्या खासदार प्रणिती शिंदे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा नगरसेवक मनीष केत,
 उपमुख्य अधिकारी पुणे मंडळ राहुल शिळीमकर,
 प्र कार्यकारी अभियंता पुणे मंडळ मिलिंद अटकळे,
 मिळकत व्यवस्थापक रूपेश जयभाये, सोलापूर उपविभाग
सूरज अजनाळकर , सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, दैनिक तरुण भारतचे संपादक प्रशांत माने, खजिनदार किरण बनसोडे, उपाध्यक्ष आफताब शेख, महाराष्ट्र राज्य पत्रकार अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके  यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 
          आमदार देवेंद्र कोठे यांनी पत्रकार संघटनांनी तब्बल २४ वर्षे केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात जागा निश्चित होऊन भूमिपूजन झाल्याचे सांगत, पत्रकारांना घर मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. सोडत प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच गुढीपाडव्यापूर्वी पत्रकारांच्या हातात घराची चावी देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
          आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी पत्रकारांच्या आर्थिक परिस्थितीचा उल्लेख करत सदनिकांची किंमत आणखी कमी करण्यासाठी शासन, सीएसआर आणि इतर माध्यमांतून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पत्रकारांसाठीचा हा प्रकल्प देशातील पहिला असल्याचेही त्यांनी नमूद केले. 
        खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीतील आठवणी सांगत, बाह्य सुविधांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याचे सांगितले. या निधीमुळे प्रत्येक सदनिकेची किंमत सुमारे २ ते २.५ लाख रुपयांनी कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
         प्रास्ताविक उपमुख्य अधिकारी पुणे मंडळ राहुल शिळीमकर यांनी केले. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.   यावेळी म्हाडाचे सोमनाथ रावळे,  गोरक्षनाथ कुलट,  बालकृष्ण दावनपल्ली , प्रमोद शिंदे , सतीश लष्करे , हरिदास देशमुख , सुमित उभाळे,  वर्षा घोरपडे,  सुनीता गोडसे यांच्यासह म्हाडाचे अधिकारी तसेच सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पत्रकार स्वतःची समस्या कधी 
सांगत नाहीत : जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी पत्रकार समाजातील प्रत्येक घटकाच्या समस्या मांडत असले तरी स्वतःच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात. सोलापुरात पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांच्या आवासाचा विषय प्राधान्यक्रमात  घेतला. लवकरात लवकर, गुढीपाडव्याच्या अगोदरच तुमच्या नव्या घरात प्रवेश व्हावा आणि घरात दूध उकळण्याचा मंगल कार्यक्रम व्हावा, हीच माझी मनापासून इच्छा आहे. आमच्या तामिळनाडूमध्ये नव्या घरात प्रवेश करताना दूध उकळण्याची परंपरा आहे. आपल्या इथेही हा मंगल सोहळा लवकरच तुमच्या घरात व्हावा, असे ते म्हणाले. 

 पत्रकारांचे ग्लॅमर कायम, अपवाद
 फक्त आर्थिक : आ. कल्याणशेट्टी 

पत्रकारांचे माझ्या राजकीय जीवनात मोठे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा मी नेहमी आदर करतो. राजकारण्यांचे ग्लॅमर पाच-दहा वर्षांचे असते मात्र पत्रकारांचे ग्लॅमर कायम असते, अपवाद फक्त आर्थिक परिस्थितीचा! समाजासाठी धावणारे पत्रकार अनेकदा स्वतःच्या कुटुंबाकडे आणि घराच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्या कुटुंबालाही स्वतःचे घर असावे अशी अपेक्षा असते, असे आ. सचिन कल्याणशेट्टी म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages