शिवरत्न शिक्षण संस्थेच्या नर्सिंग कॉलेजमध्ये पदवी प्रदान सोहळा संपन्न
अकलूज (कटूसत्य वृत्त):- शिवरत्न शिक्षण संस्था संचलित विजयसिंह मोहिते-पाटील स्कूल अँड कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, अकलूज येथील B.Sc. आणि M.Sc. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान (Graduation Ceremony 2026) सोहळा शंकरनगर येथील उदय सभागृहात अत्यंत दिमाखदार वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक व प्रमुख पाहुण्या म्हणून कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सायन्सेस (कराड) च्या अधिष्ठाता (Dean) डॉ. वैशाली मोहिते उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते-पाटील व सचिव धर्मराज दगडे उपस्थित होते. तर इशितादेवी मोहिते-पाटील, डॉ. राजे भोसले, नितीन बनकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील यावेळी बोलताना म्हणाल्या "आपल्या नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी विविध गावांमध्ये जाऊन उत्कृष्ट सामाजिक काम करत असतात. परंतु आजच्या सोशल मीडियाच्या युगात मुलांच्या कौशल्याचे आणि मेहनतीचे ग्रॅज्युएशन सोहळ्याच्या माध्यमातून कौतुक होणे गरजेचे होते. नवीन पिढीच्या विचारसरणीनुसार यावर्षीपासून आपण कॉलेजमध्ये प्रथमच पदवी प्रदान सोहळा सुरू केला आहे. आपल्या कॉलेजचे विद्यार्थी पुणे-मुंबईसारख्या शहरांत व देश विदेशात मोठ्या पदांवर प्रगती करत आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे."
केवळ उपचार नव्हे, तर रुग्णांना आपुलकीची साथ द्या; स्तनाच्या कर्करोगाबाबत सतर्क राहा.
तर डॉ. वैशाली मोहिते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले, "अकलूजमध्ये आल्यानंतर मला स्वतःच्या माहेरी आल्यासारखा आनंद झाला. वैद्यकीय क्षेत्रात केवळ 'क्युअर आणि केअर' (उपचार व काळजी) पुरेशी नसते, तर आपल्या गोड शब्दांनी रुग्णांचे मन जिंकणे आणि त्यांना मानसिक आधार देणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्याकडे अष्टलक्ष्मी असण्यापेक्षा 'आरोग्यलक्ष्मी' असणे सर्वात श्रेष्ठ आहे."
पुढे बोलताना त्यांनी महिलांच्या आरोग्यावर विशेष भर दिला. त्या म्हणाल्या, "सध्या महिलांमध्ये छातीचा (स्तनाचा) कर्करोग (Breast Cancer) ही एक अत्यंत गंभीर समस्या निर्माण होत चालली आहे. महिलांनी सुरुवातीच्या टप्प्यापासूनच याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य उपचार घेतले, तर हा गंभीर आजार नक्कीच पूर्णपणे टाळता येतो."
याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व संचालक मंडळ, एल.एम.सी. सदस्य, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पदवीप्राप्त विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या सर्व टीमने विशेष परिश्रम घेतले. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:
Post a Comment