विद्या विकास प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलमध्ये रक्तदान शिबिर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विद्या विकास प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाचे वर्धापन दिन व मा. आमदार बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिम्मित महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिर व वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.
रक्तदान हे श्रेष्ठ सामाजिक कार्य असून, गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताचा साठा उपलब्ध राहणे अत्यंत आवश्यक आहे. याच सामाजिक जाणिवेतून संस्थेच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला संस्थेतील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच इतर स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण १४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सोलापूरचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद पवार (संचालक ACS हॉस्पिटल, सोलापूर) आणि सन्माननीय अतिथी मनोज बागल (पोलीस उपनिरीक्षक, सोलापूर) व संतोष काजळे (पोलीस उपनिरीक्षक, सोलापूर) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अमोल (नाना) चव्हाण, संस्थापक चेअरमन डॉ. जी. के. देशमुख, व्हाईस चेअरमन मधुकर कटकधोंड, संस्थेचे ट्रस्टी सौ. अनिता चव्हाण व रोहन देशमुख, संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य व कॅम्पस संचालक डॉ. अरुण गायकवाड, तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. कुलकर्णी, व्ही.व्ही.पी. ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य प्रा. संतोष माने तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “रक्तदान हे केवळ सामाजिक कार्य नसून एखाद्याचे प्राण वाचविण्याचे महान कार्य आहे. प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी.”
शिबिरामध्ये रक्तदात्यांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून तज्ज्ञ वैद्यकीय पथकाच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित पद्धतीने रक्त संकलन करण्यात आले. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. याशिबिरास अक्षय रक्तपेढी, म. बसवेश्वर रक्तपेढी, अश्विनी रक्तपेढी व मार्कंडेय रक्तपेढी यांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिबिर समन्वयक प्रा. संजय बुगडे व प्रा. अनिल काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, मानवतावादी दृष्टिकोन आणि समाजसेवेची भावना निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष माने यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अविनाश पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सह कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
रक्तदान शिबिराच्या माध्यमातून “रक्तदान करा – जीवन वाचवा” हा मानवतावादी संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला. विद्या विकास प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलामध्ये या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष अमोल (नाना) चव्हाण, संस्थापक चेअरमन डॉ. जी. के. देशमुख तसेच व्हाईस चेअरमन मधुकर कटकधोंड यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.
.png)
No comments:
Post a Comment