जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या सोलापूर चॅप्टरचा आज पदग्रहण समारंभ
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (JITO) या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत संस्थेच्या सोलापूर चॅप्टरचा पदग्रहण समारंभ गुरुवार, ३ सप्टेंबर रोजी गुजराती मित्र मंडळ, सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. सोलापुरात JITO चॅप्टर सुरू करण्यासाठी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना आता मूर्त स्वरूप मिळत असून, यामुळे सोलापूरच्या उद्योजक व व्यावसायिक जगताला एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे, अशी माहिती अभय सुराणा यांनी दिली.
*या पदग्रहण समारंभास JITO Apex, JITO ROM तसेच JITO चे विविध राष्ट्रीय व प्रादेशिक पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत JITO Solapur Chapter च्या नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ संपन्न होणार आहे.
JITO ची स्थापना २००७ मध्ये झाली असून, आज देशभर तसेच परदेशातही संस्थेचे विविध चॅप्टर कार्यरत आहेत. संस्थेशी ९०,००० पेक्षा अधिक उद्योजक, व्यावसायिक आणि युवा सदस्य जोडले गेले आहेत. ज्ञानवृद्धी, आर्थिक सक्षमीकरण, सामाजिक संपर्क आणि सेवा या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीस हातभार लावणे, हे JITO चे प्रमुख उद्दिष्ट आहे.
“Business with Ethics and Community Service” या विचारातून JITO कार्यरत आहे. उद्योजकांची व्यावसायिक प्रगती साधण्याबरोबरच समाजासाठी योगदान देणे, हा संस्थेच्या कार्याचा महत्त्वाचा भाग आहे.
सोलापूर JITO चॅप्टरच्या माध्यमातून स्थानिक उद्योजकांना देशभरातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योजकांशी नेटवर्किंग, व्यवसायवृद्धीसाठी मार्गदर्शन, ज्ञानविनिमय, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आणि नवीन व्यावसायिक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
आजच्या स्पर्धात्मक व्यावसायिक वातावरणात व्यवसाय वाढविण्यासाठी केवळ भांडवल पुरेसे नसून योग्य मार्गदर्शन, तंत्रज्ञान, कौशल्य, नेटवर्किंग आणि नवीन बाजारपेठांशी संपर्क आवश्यक आहे. या सर्व बाबींमध्ये JITO सोलापूरमधील प्रस्थापित तसेच नवोदित उद्योजकांना आवश्यक सहकार्य आणि प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देईल.
तसेच JITO Main Chapter सोबत JITO Youth Wing आणि JITO Ladies Wing यांच्या माध्यमातून युवा आणि महिला उद्योजकांनाही व्यवसायवृद्धी, नेतृत्वगुण, कौशल्यविकास आणि नेटवर्किंगच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सोलापूर हे उद्योग, व्यापार आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर असून, येथील उद्योजकतेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक बळ मिळावे, यासाठी JITO Solapur Chapter महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास अभय सुराणा यांनी व्यक्त केला.
“सोलापूरच्या उद्योजकांना एकत्र आणून परस्परांच्या अनुभवातून शिकण्याची, व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण करण्याची आणि समाजासाठी एकत्रितपणे काम करण्याची संधी JITO च्या माध्यमातून मिळणार आहे. आगामी काळात JITO Solapur Chapter सोलापूरच्या उद्योग व व्यापार क्षेत्राच्या प्रगतीसाठी निश्चितच महत्त्वाची भूमिका बजावेल,” असे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment