ग्रामसेवकावरील हल्ल्याचा मूकमोर्चातून निषेध
दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करून जलदगती न्यायालयात खटला चालविण्याची मागणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : कर्तव्य बजावत असताना ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले, वाढती असुरक्षितता आणि मानसिक त्रासाच्या घटनांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या वतीने मंगळवारी जिल्हा परिषद कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूकमोर्चा काढण्यात आला.
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे १७ ऑगस्ट रोजी ग्रामसभेत शासकीय कामकाज सुरू असताना ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांच्यावर अमानुष हल्ला झाला. या घटनेनंतर झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासामुळे त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा तीव्र निषेध करत ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
पी. एन. पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करून खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. तसेच ग्रामपंचायतीच्या वर्षभरात होणाऱ्या १० ते १२ ग्रामसभांऐवजी वर्षातून केवळ एक आर्थिक नियोजन व आढावा ग्रामसभा घेण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
ग्रामसभांमध्ये अनधिकृत व्हिडिओ चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारित करत कर्मचाऱ्यांची बदनामी करण्याच्या प्रकारांवर कायदेशीर बंदी घालावी, संवेदनशील ग्रामसभांसाठी विनामूल्य पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा, तसेच इतर विभागांच्या विशेष ग्रामसभांची जबाबदारी संबंधित विभागांवरच सोपवावी, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील लाभार्थी निवड प्रक्रिया तालुका स्तरावरून पारदर्शक पद्धतीने राबवावी, अशी मागणीही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी केली.
या मूकमोर्चात युनियनचे जिल्हाध्यक्ष शरद भुजबळ, मानद अध्यक्ष सुशेन ननवरे, कार्याध्यक्ष नारायण ढवळे, सरचिटणीस दयानंद पाटील यांच्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य ग्रामपंचायत अधिकारी सहभागी झाले होते. जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटनेच्या वतीने राजेश देशपांडे यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.
No comments:
Post a Comment