स्मार्ट कार्ड नाही, तर सवलतही नाही! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 3, 2026

स्मार्ट कार्ड नाही, तर सवलतही नाही!

                                       स्मार्ट कार्ड नाही, तर सवलतही नाही!

              ‘एनसीएमसी’ कार्ड सक्तीमुळे महिला, ज्येष्ठांना पूर्ण तिकिटाचा फटका



सोलापूर (कटूसत्य वृत्त) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसप्रवासातील शासकीय सवलतींचा लाभ घेण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी (एनसीएमसी) स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी मंगळवारपासून सुरू झाली. मात्र, पहिल्याच दिवशी या निर्णयाचा फटका महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना बसला. कार्ड नसल्यास सवलतीचे तिकीट मिळणार नसल्याने अनेक प्रवाशांना ऐनवेळी पूर्ण तिकीट काढावे लागले.


एनसीएमसी कार्डची सक्ती लागू होताच सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकासह जिल्ह्यातील विविध एसटी आगारांमधील कार्ड नोंदणी केंद्रांवर सकाळपासूनच प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या. सवलतीच्या प्रवासासाठी कार्ड अनिवार्य असल्याची माहिती अनेक प्रवाशांना उशिरा मिळाल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी कार्ड काढण्यासाठी केंद्रांकडे धाव घेतली.


मात्र, वाढलेली गर्दी, संथ सर्व्हर आणि तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी प्रक्रियेला विलंब झाला. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे, केवळ कार्ड असणे पुरेसे नसून ते सक्रिय असणे आणि त्यामध्ये आवश्यक रक्कम टॉप-अप केलेली असणे गरजेचे आहे. मंगळवारी अनेक प्रवाशांच्या कार्डमध्ये टॉप-अप नसल्याचेही निदर्शनास आले.


७५ वर्षांवरील ज्येष्ठांना तात्पुरता दिलासा


अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड सक्तीमधून सध्या तात्पुरती सूट देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांचे बायोमेट्रिक ठसे उमटत नसल्याने कार्ड नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे अशा प्रवाशांना काही काळासाठी कार्ड सक्तीमधून वगळण्यात आले आहे.


५० टक्के सवलतीऐवजी पूर्ण तिकीट


महिलांना एसटी प्रवासात मिळणाऱ्या ५० टक्के सवलतीसह ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सवलतीसाठी एनसीएमसी कार्ड आवश्यक करण्यात आले आहे. कार्ड सक्तीची अंतिम मुदत ३१ ऑगस्टपर्यंत होती. मुदत संपल्यानंतर मंगळवारपासून सक्रिय एनसीएमसी कार्डशिवाय सवलतीचे तिकीट देण्यात आले नाही.


पहिल्याच दिवशी अनेक महिला आणि ज्येष्ठ नागरिक कार्डविना प्रवासासाठी आल्याने त्यांना सवलतीऐवजी पूर्ण तिकीट काढावे लागले. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, कार्ड सक्तीबाबत पुरेशी जनजागृती आणि पूर्वसूचना देण्यात आली नसल्याची तक्रारही प्रवाशांकडून करण्यात येत आहे.


सर्वसामान्य प्रवाशांची धावपळ


एनसीएमसी कार्ड नोंदणी, बायोमेट्रिक प्रक्रिया, कार्ड सक्रिय करणे आणि टॉप-अप याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने अनेक प्रवाशांची धावपळ उडाली. सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी प्रवाशांना आधी कार्ड काढणे, ते सक्रिय करणे आणि त्यामध्ये आवश्यक रक्कम भरणे या प्रक्रियेतून जावे लागत आहे.


एसटी प्रशासनाने कार्ड सक्तीचा निर्णय घेताना प्रवाशांना पुरेसा वेळ आणि स्पष्ट मार्गदर्शन देणे आवश्यक होते. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी निर्माण झालेल्या गर्दी आणि तांत्रिक अडचणींमुळे महिला व ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक फटका तसेच मनःस्ताप सहन करावा लागला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages