खरडून गेलेल्या शेतजमिनींची नुकसानभरपाई तातडीने द्या
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)चे मोहोळ तहसीलदारांना निवेदन
मोहोळ (कटूसत्य वृत्त) : मोहोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये मागील वर्षी अतिवृष्टी व पुरामुळे खरडून गेलेल्या शेतजमिनींच्या नुकसानीचे प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावेत, तसेच पूरग्रस्त भागातील विहिरींमधील गाळ काढण्यासाठी मंजूर झालेल्या अनुदानाचा प्रलंबित दुसरा हप्ता शेतकऱ्यांना तातडीने वितरित करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे मोहोळ तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुराच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी सुपीक माती वाहून गेल्याने शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, या नुकसानीची भरपाई अद्याप अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही.
नुकसानग्रस्त शेतजमिनींचे पंचनामे करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेल्या प्रकरणांचे प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठवावेत आणि पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान, पूरग्रस्त भागातील अनेक विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. विहिरीतील गाळ काढण्यासाठी शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाचा दुसरा हप्ता अनेक लाभार्थ्यांना अद्याप मिळालेला नाही. हा प्रलंबित हप्ता तातडीने वितरित करावा, तसेच अनुदानासाठी प्रलंबित असलेले प्रस्तावही शासनाकडे तत्काळ पाठवावेत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी पल्लवी पाटील, प्राजक्ता आरबळकर, संजय क्षीरसागर, सतीश पाटील, डॉ. बाळासाहेब वाघमोडे, सोमनाथ व्यवहारे, यमुना इंगळे, लतिका बनसोडे, सुभाष शेंडेकर, शैलेश कुंभार आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment