शिंदेसेनेत पदाधिकारी, इच्छुकांची रस्सीखेच - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 3, 2026

शिंदेसेनेत पदाधिकारी, इच्छुकांची रस्सीखेच

 शिंदेसेनेत पदाधिकारी, इच्छुकांची रस्सीखेच

जिल्हाप्रमुखपदी अमोल शिंदे, तर शहरप्रमुखांसाठी साठेंचे नाव अग्रस्थानी




सोलापूर (कटूसत्य वृत्त) : सोलापूर शहर व जिल्ह्यातील शिंदेसेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीला अद्याप मुहूर्त लागलेला नसला, तरी विविध पदांसाठी इच्छुकांची नावे चर्चेत येऊ लागली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची जुनी शहर व जिल्हा कार्यकारिणी बरखास्त होऊन पाच महिने उलटले आहेत. मात्र, अद्याप नव्या कार्यकारिणीची घोषणा झालेली नाही.


नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे राहणार आहेत. मात्र, खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या निकटवर्तीयांना नव्या कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक रचनेतही बदल करण्याची तयारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. खासदार तथा सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख धैर्यशील माने आणि खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नव्या कार्यकारिणीला अंतिम स्वरूप दिले जाण्याची शक्यता आहे.


जिल्हाप्रमुखपदी अमोल शिंदे?


सत्ताधारी पक्षातील विविध पदांसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. मतदारसंघनिहाय संघटन मजबूत करण्यासाठी विद्यमान रचनेत बदल करत जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी पुन्हा अमोल शिंदे यांच्याकडे सोपविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही त्यांनी जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहिले आहे. महापालिका सभागृहातील आक्रमक गटनेता म्हणूनही त्यांची ओळख आहे.


तीन विधानसभा मतदारसंघांसाठी स्वतंत्र शहरप्रमुख?


शहरप्रमुख पदाच्या रचनेतही बदल होण्याची शक्यता आहे. सोलापूर शहरासाठी एकच शहरप्रमुख नियुक्त करण्याऐवजी शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांसाठी स्वतंत्र शहरप्रमुख नेमण्याची मागणी पुढे आली आहे.


संभाव्य नावांमध्ये शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी नगरसेवक प्रियदर्शन साठे, दक्षिण सोलापूरसाठी माजी उपमहापौर राजेश काळे आणि शहर उत्तरसाठी राजू आलूरे यांची नावे चर्चेत आहेत.


महापालिका निवडणुकीच्या काळात राजेश काळे यांनी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. तसेच राजू आलूरे यांनीही भाजपविरोधात भूमिका घेतल्यानंतर शिवसेनेची वाट धरली होती. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांनाही संघटनेत महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


एकीकडे नव्या कार्यकारिणीच्या घोषणेची प्रतीक्षा असताना दुसरीकडे विविध पदांसाठी इच्छुकांची वाढती संख्या पाहता शिंदेसेनेतील अंतर्गत रस्सीखेच वाढल्याचे चित्र आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाची ताकद वाढविण्यासाठी कोणाच्या गळ्यात कोणती जबाबदारी पडते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages