MPSC, MHT-CET घोटाळ्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडचे निवेदन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 6, 2026

MPSC, MHT-CET घोटाळ्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडचे निवेदन

 MPSC, MHT-CET घोटाळ्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडचे निवेदन

ऑनलाइन परीक्षा रद्द करण्याची मागणी



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- MPSC पेपरफुटी, MHT-CET परीक्षा घोटाळा, शिक्षक पात्रता परीक्षा (TET) कायमस्वरूपी रद्द करणे तसेच सर्व भरती व प्रवेश प्रक्रिया ऑनलाइनऐवजी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, राज्यात मागील काही वर्षांपासून MPSC, MHT-CET, NEET, औषध निर्माणशास्त्र परीक्षा आदी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्याने पेपरफुटी व गैरव्यवहाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची मेहनत, वेळ आणि लाखो रुपयांचा खर्च वाया जात असून विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

MHT-CET प्रवेश प्रक्रियेतील पर्सेंटाईल पद्धत ग्रामीण व गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. ही पद्धत विशिष्ट घटकांना लाभदायक ठरत असून तिचा फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि अनागोंदीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून सरकारने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. पेपरफुटी व गैरव्यवहारातील दोषींवर कठोर कारवाई करून पीडित विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

सरकारने तातडीने ठोस निर्णय घेतला नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे नेते तथा धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख सोमनाथ राऊत, शहराध्यक्ष प्रकाश ननवरे, उपाध्यक्ष सचिन चव्हाण, प्रसिद्धीप्रमुख नितीन मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष अजयसिंह सौंदमळे, अंबादास सपकाळे, रमेश अण्णा जाधव, कल्याण गव्हाणे, प्रकाश व्यवहारे, प्रकाश डोंगरे, अजसिंग भोसले, अजय जाधव, विजय जाधव यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.
 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages