लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉ एम एस स्वामीनाथन यांना अभिवादन

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉ एम एस स्वामीनाथन यांची जयंती शाश्वत शेती दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ एम एस स्वामीनाथन यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रा. सायली बडेकर, प्रा. आशिष सरकाळे, प्रा. सुषमा ढावरे तसेच महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयाचे विद्यार्थी अभिजीत तनपुरे, वैष्णवी मागाडे, मैथिली कोळी यांनी डॉ एम एस स्वामीनाथन यांचे कृषी क्षेत्रातील कार्य व भारताच्या अन्नसुरक्षेतील योगदान याविषयी मनोगत व्यक्त केले. प्रा सायली बडेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की डॉ. एम. एस. स्वामीनाथन हे केवळ एक शास्त्रज्ञ नव्हते, तर ते भारताचे अन्नसुरक्षेचे शिल्पकार होते. त्यांनी आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून गहू आणि तांदळाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित केल्या. त्यांनी केवळ प्रयोगशाळेत संशोधन केले नाही, तर ते संशोधन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवले. त्यांच्या या क्रांतीमुळे भारताचे कोठार अन्नधान्याने भरून गेले आणि भारत हा अन्न आयात करणाऱ्या देशांमधून जगाला अन्न निर्यात करणारा देश बनला. म्हणूनच त्यांना 'भारताच्या हरित क्रांतीचे जनक' म्हटले जाते. आज हवामान बदल, पाण्याची टंचाई आणि वाढती लोकसंख्या यांमुळे आपल्या शेतीसमोर पुन्हा एकदा मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. स्वामीनाथन यांनी नेहमी 'शाश्वत शेती' आणि 'सदाहरित क्रांती' यावर भर दिला. म्हणजेच, निसर्गाचे नुकसान न करता शेतीचे उत्पादन वाढवणे. आपल्या देशातील तरुण पिढीने कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती आणि कृषी-व्यवसाय यांकडे वळले पाहिजे. शेतकऱ्याला त्याच्या घामाचे योग्य दाम मिळवून देणे आणि शेतीला मानाचे स्थान मिळवून देणे, हीच डॉ. स्वामीनाथन यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती जाधवर यांनी व आभारप्रदर्शन मैथिली कोळी यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment