शासकीय वसतिगृह योजनेसाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहिर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला ७ ऑगस्ट २०२६ पासून प्रारंभ होत आहे. बारावीनंतर किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण होऊन उच्च शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सोलापूर गणेश सोनटक्के यांनी केले आहे.
शासकीय वसतिगृह योजनेची प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार असून त्यासाठी प्रवेश प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. नवीन विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org/ या संकेतस्थळावरील New पर्यायातून अर्ज सादर करावेत.
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे : अर्ज स्वीकारण्याचा कालावधी ७ ते ३१ ऑगस्ट २०२६, अर्ज छाननी १ ते ७ सप्टेंबर २०२६, पहिली गुणवत्ता यादी ८ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. पहिल्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना १८ सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रवेश घेता येईल. रिक्त जागांसाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची दुसरी गुणवत्ता यादी २१ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांनी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रवेश निश्चित करावा.
वसतिगृहातील प्रवेश रिक्त जागांच्या उपलब्धतेनुसार आरक्षणाच्या निकषांनुसार करण्यात येणार आहेत. त्यामध्ये इतर मागास प्रवर्ग (५१ टक्के), विमुक्त जाती-भटक्या जमाती (३३ टक्के), विशेष मागास प्रवर्ग (६ टक्के), दिव्यांग (४ टक्के), अनाथ (२ टक्के) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) (४ टक्के) यांचा समावेश आहे.
पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज करून शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सोलापूर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment