पिडीत मुलीला मिळाला न्याय; आरोपीस २० वर्ष सक्षम कारावास
अकलूज पोलिसांच्या दमदार कामगिरीचे कौतुक
अकलूज (कटूसत्य वृत्त):- पिडिते सोबत राहून, तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस,२० वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली असून,दमदार कामगिरीमुळे अकलूज पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ११/११/२०२३ रोजी फिर्यादीची अज्ञान मुलगी (पिडिता) हिला, फिर्यादीचा भाऊ याने महाळुंग ता. माळशिरस येथे नेले होते व त्याच्या दुस-या दिवशी कुलदैवत राजबकक्षल दर्गा अकलुज येथे देवदर्शन करुन ,पिडितेला फिर्यादीच्या घरी तो आणुन सोडणार होता.
दिनांक २०/११/२०२३ रोजी आरोपी क. २. अमर रहिम शेख याने, पिडितेला फिर्यादीच्या भावाकडुन, तिला फिर्यादीच्या घरी नेऊन सोडतो असे सांगुन, पिडितेला अकलुज मधून त्याच्याकडे घेतले. त्यानंतर त्याने आरोपी क. १. तसलिम ताजुद्दीन शेखची मदत घेऊन, पिडितेला पळवुन नेले. आरोपी क. १. तसलिम ताजुद्दीन शेख याने मोटार सायकलवरुन, अकलुजहुन आरोपी क. २. अमर रहिम शेख व पिडितेला माळशिरस बसस्थानकावर सोडले.
माळशिरस बसस्थानकावरुन आरोपीने पिडितेला सातारा, गणपतीपुळे, विशाळगड इ. ठिकाणी दिनांक २०/११/२०२३ ते दिनांक १२/१२/२०२३ या कालावधीत नेले व त्या ठिकाणी हॉटेल/लॉज/रुममध्ये पिडितेसोबत राहुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या गुन्हयाचा सहा. पोलीस निरीक्षक गणेश बी. चौधरी यांनी सखोल तपास करुन आरोपीविरुध्द जिल्हा व सत्र न्यायालय, माळशिरस या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सदरची न्याय चौकशी एल. डी. हुली, जिल्हा व सत्र न्यायाधीश, माळशिरस यांच्या समोर चालून या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकुण १३ साक्षीदार तपासण्यात आले व आरोपी क. २ च्या बाजूने, २ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही आरोपीच्या विरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने, दोन्ही आरोपींना दोषी धरुन एल. डी. हुली, जिल्हा सत्र न्यायाधीश माळशिरस यांनी आरोपी क. १. तसलिम ताजुद्दीन शेख यास कलम ३६३ सह ३४ अंतर्गत ३ वर्षे सक्षम कारावास व ३,०००/- रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिन्याची साधा तुरुंगवास व आरोपी क. २. अमर रहिम शेख यास ३६३ सह ३४ अंतर्गत ३ वर्षे सक्षम कारावास व ३,०००/- रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिन्याची साधा तुरुंगवास व बालकांचे लैंगिक गुन्हयापासून संरक्षण अधिनियम कलम ४ अंतर्गत २० वर्षे सक्षम कारावास व ७,०००/- रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिन्याची साधा तुरुंगवास अशी शिक्षा ठोठावण्यात आली.
सदर केस मध्ये पिडिता व तिची आई (फिर्यादी), फिर्यादीचा भाऊ, दोन वैदयकिय अधिकारी, लॉज/हॉटेलचे मालक व तपासी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक गणेश चौधरी यांचे साक्ष महत्वाच्या ठरल्या.
सदर केसमध्ये संतोष वाळके, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलुज उपविभाग, अकलुज, निरज उबाळे पोलीस निरीक्षक, अकलुज पोलीस ठाणे यांनी मार्गदर्शन केले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. संग्राम एस. पाटील यांनी काम पाहिले. तसेच कोर्ट पैरवी पो. हे. कॉ. आर. एम. तांबोळी व पो.कॉ. के. एस. हांगे या दोघांनी पाहिले व त्यांना पोलिस निरिक्षक निरज उबाळे, अकलुज पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शन लाभले.
.png)
No comments:
Post a Comment