१२ व्या राष्ट्रीय हातकरघा दिनानिमित्त हातमाग परंपरेचा गौरव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 8, 2026

१२ व्या राष्ट्रीय हातकरघा दिनानिमित्त हातमाग परंपरेचा गौरव

 १२ व्या राष्ट्रीय हातकरघा दिनानिमित्त हातमाग परंपरेचा गौरव




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारत सरकारच्या वस्त्र मंत्रालयाअंतर्गत विकास आयुक्त (हातकरघा) कार्यालय, मुंबई तसेच बुनकर सेवा केंद्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा राष्ट्रीय हातकरघा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोलापूरच्या समृद्ध हातमाग परंपरेचा गौरव करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमास सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र (दादा) कोठे व सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात हातमाग उद्योगातील विणकर, उद्योजक, कारागीर, सहकारी संस्थांचे पदाधिकारी तसेच वस्त्रोद्योग क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास  तसेच कुरुहिनशेट्टी ज्ञाती  संस्था, सोलापूरचे उपाध्यक्ष ॲड. सिद्धेश्वर  बुगाडे, वस्त्रोद्योग  मंत्रालयाचे सहाय्यक निदेशक विजयकुमार साळे, विनय दोते यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम  यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच हातमाग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विणकरांचा सन्मान करण्यात आला. भारतीय हातमाग उद्योगाचा समृद्ध इतिहास, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नव्या बाजारपेठांतील संधी आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
महापौर विनायक कोंड्याल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "सोलापूरची ओळख जगभरात हातमाग उद्योगामुळे निर्माण झाली आहे. येथील विणकरांनी आपल्या कष्ट, कौशल्य आणि परंपरेच्या बळावर सोलापूरचे नाव देश-विदेशात पोहोचविले आहे. ही परंपरा जतन करणे आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. हातमाग उद्योगाला आधुनिक तंत्रज्ञान, विपणन सुविधा आणि शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी सोलापूर महानगरपालिका सकारात्मक सहकार्य करेल."
आमदार देवेंद्र (दादा) कोठे यांनी हातमाग उद्योग हा सोलापूरच्या अर्थव्यवस्थेचा आणि सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा घटक असल्याचे सांगून विणकरांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे नमूद केले. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांद्वारे हातमाग क्षेत्राला अधिक बळकटी दिली जात असून, विणकरांच्या उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात उपस्थित विणकरांनी आपल्या समस्या व अपेक्षा मांडल्या. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी शासनाच्या विविध योजना, प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य, डिझाईन विकास आणि विपणन सुविधांबाबत सविस्तर माहिती दिली.
राष्ट्रीय हातकरघा दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे सोलापूरच्या समृद्ध हातमाग परंपरेला उजाळा मिळाला असून, विणकरांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमास हातमाग क्षेत्रातील विविध संस्था, विणकर बांधव, महिला कारागीर, वस्त्रोद्योग प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages