जलयुक्त शिवारची उर्वरित २१५ कामे ३१ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावीत - जिल्हाधिकारी कार्तिकेयन
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलयुक्त शिवार अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी राहुल क्षीरसागर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. हरसुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन म्हणाले की, सर्व प्रांताधिकाऱ्यांनी या कामांमध्ये लक्ष घालावे. पुढील दोन दिवसात तालुकास्तरीय समितीच्या बैठका घेऊन कृषी विभागाची २०३ कामांचे प्रस्ताव त्वरित मंजूर करून जिल्हास्तरीय समितीकडे पाठवावेत. तसेच जिल्हा परिषदेने ७१ कामे जलतारा योजनेत घेऊन तीही तालुकास्तरीय बैठकीत मंजूर करावीत. सर्व यंत्रणांनी जलयुक्तमधील कामांचे जिओ टॅगिंगचे फोटो आठ दिवसात अपलोड करावेत, असेही त्यांनी निर्देश दिले.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना २.० अंतर्गत जिल्ह्यात चार प्रकल्पांची कामे सुरू आहेत. आतापर्यंत ८२.५३ कोटी रुपये निधी खर्च झाला आहे. मात्र मागील चार महिन्यात कामे पूर्ण करून निधी खर्च करण्यात हलगर्जीपणा दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी पुढील आठ दिवसात कामे पूर्ण करून शंभर टक्के निधी खर्च करण्याची कार्यवाही करावी. प्रकल्प एक, दोन व तीनचे संबंधित अधिकारी यांनी कामे व निधी खर्चात हलगर्जीपणा केल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावावी, असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्हा जलसंधारण अधिकारी क्षीरसागर यांनी जलयुक्त शिवार अभियान, कृषी सिंचन योजना व गाळमुक्त धरण योजनेअंतर्गत झालेल्या कामांची माहिती दिली. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ३.० मध्ये यावर्षी पुन्हा सोलापूर जिल्ह्याची निवड झाल्याचे त्यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार अभियानाच्या ३५७२ कामांसाठी ९५.१५ कोटी रुपये निधी निश्चित करण्यात आला आहे. यात मृद व जलसंधारण विभाग, कृषी विभाग, भूजल सर्वेक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा, वनविभाग व जलसंपदा विभाग यांचा सहभाग आहे. या कामांमुळे ६२३७.९१ टीसीएम पाणीसाठा निर्माण होऊन २४०५.८३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या चार प्रकल्पांसाठी एकूण ३२.९७ कोटी रुपये निधी तरतूद असून त्यापैकी ८२.५३ टक्के खर्च झाला आहे. जलतारा योजनेतील ३७६ कामे मंजूर असून १५५ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अमृत सरोवरांतर्गत मंगळवेढा तालुक्यात ७ कामे मंजूर झाली आहेत. वैयक्तिक लाभार्थी उत्पादन पद्धतीसाठी ३.२३ कोटी रुपये मंजूर असून त्यापैकी ९१.८३ टक्के खर्च पूर्ण झाला आहे. गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजनेअंतर्गत सुरू असलेली नऊ कामे पावसामुळे बंद आहेत. पावसाळा संपल्यानंतर ती कामे सुरू केली जातील, असे जिल्हा जलसंधारण अधिकारी राहुल क्षीरसागर यांनी सांगितले.
.png)
No comments:
Post a Comment