ओरिजनल पैठणीवर येणार बारकोड अन् लोगो
ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी उपाय
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पैठणी म्हणजे महिलांच्या सौंदर्य खुलवणारं वस्त्रभूषण आहे, खेळ पैठणीच्या माध्यममातूनही पैठणी हा वस्त्रअलंकार घराघरात पोहोचला आहे. तसेच, सणासाठी, लग्नासमारंभासाठीही पैठणीची वेगळीच क्रेझ महिला वर्गात पाहायला मिळते.
मात्र, ओरिजनल पैठणी म्हणत, सेमी पैठणी आणि डुप्लीकेट पैठणी देखील बाजारात विकली जाते. मात्र, आता याच सेमी पैठणी आणि ओरिजनल पैठणीतील फरक स्पष्ट होणार आहे. राज्याच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाने त्यासाठी नवी शक्कल लढवली असून ग्राहकांना दोन्हीतील फरक समजून पैठणी खरेदीपासून त्यांची होणारी फसवणूक टळणार आहे. राज्याचे स्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे (Sanjay sawkare) यांनी पंढरपुरातून (Pandharpur) याबाबत माहिती दिली.
ग्राहकांना खरी पैठणी ओळखता यावी यासाठी आता पैठणीवर एक बारकोड आणि लोगो बनवण्याचा प्रयत्न वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून सुरू आहे. त्यामुळे, पैठणी खरेदी करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक होणार नाही, अशी माहिती राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली. आज पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आले असता सावकारे यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देत याबाबत सांगितले. संजय सावकारे यांनी विठ्ठल मंदिरात येऊन दर्शन घेतले. यावेळी पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. खऱ्या पैठणीची ओळख होण्यासाठी बारकोडच्या माध्यमातून कोणता धागा वापरलाय, कोणत्या गावात कोणत्या कारागिरांनी ही पैठणी तयार केली याची संपूर्ण माहिती ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बनावट पैठणी ओळखता येणार असल्याचे सावकारे यांनी सांगितले. पैठणी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे पैठणीला मागणी खूप आहे, तो एक कलेचा भाग आहे, एक पैठणी तयार करायला 20 ते 30 दिवस एवढा कालावधी कारागिरांना लागतो. पैठणीचे उत्पादन वाढवण्यासाठी कामगारांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सुद्धा विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. पैठणी विक्रीसाठी वस्त्रोद्योग विभागाच्या माध्यमातून आम्ही प्रदर्शन भरवत असतो, त्यामधून सुद्धा पैठणी खरेदीसाठी चांगली मागणी मिळत असल्याचे सावकारे यांनी सांगितले.
मराठा बांधवांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार
दरम्यान, मराठा तरुणांनी विठ्ठल मंदिरापाशी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्याबाबत निवेदन दिले. यावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष किरण राज घाडगे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. मनोज जरांगे यांचे सुरू असलेले उपोषण बाबत मराठा तरुणांनी दिलेले निवेदन मुख्यमंत्र्यांकडे पाठविणार असून मुख्यमंत्री हे जरांगे पाटील यांच्या काही त्रुटी असतील तर त्या नक्की दूर करतील असे त्यांनी सांगितले. लक्ष्मण हाके यांच्या मोर्चा बाबत बोलताना, सरकारला सर्व घटकांना घेऊन पुढे जावे लागत असते. त्यामुळे राज्यातील सर्वच घटकांच्या मागण्या मुख्यमंत्री पूर्ण करतील असा विश्वास वस्त्रोद्योग मंत्र्यांनी व्यक्त केला.
.jpg)
No comments:
Post a Comment